Published on
:
18 Nov 2024, 12:09 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:09 am
पणजी : पणजीत 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अर्थात इफ्फीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रतिनिधी गोव्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. इफ्फी स्थळ परिसरातील लगबग वाढली असून आयनॉक्स, ओल्ड जीएमसी बिल्डिंग, मनोरंजन सोसायटी प्रशासन बिल्डिंग, कला अकादमी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम इमारतीची रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली आहे. तर या इमारतींसह परिसरात विद्युत रोषणाईचे काम सुरू झाले आहे. याशिवाय स्वागत कमानी, तात्पुरते तंबू उभारण्यात आले असून इतर कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
चित्रपट महोत्सवासाठी सुमारे 7 हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली असून यात 3642 प्रतिनिधी, 1148 विद्यार्थी तर 1213 चित्रपट उद्योगाशी निगडित प्रतिनिधी आहेत. याशिवाय इफ्फी कव्हर करण्यासाठी डिजिटल माध्यमातील 95, माध्यम प्रतिनिधी म्हणून 564 तर 123 कॅमेरामन्सनी आपली नोंदणी केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे हा महोत्सव गोव्यात होतो. यासाठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, महोत्सव समितीचे पदाधिकारी, सुकाणू समितीचे प्रतिनिधी, तिन्ही चित्रपट स्पर्धा परीक्षण मंडळ गोव्यात दाखल झाले आहे.
चित्रपट महोत्सवासाठी आयोजकांकडून प्रतिनिधीकरता माहिती आणि इतर बाबींचे जे किट दिले जातात. त्याचे वितरण उद्या सोमवारपासून वितरित केले जाणार आहे. याशिवाय प्रिंट झालेली ओळखपत्रे टप्प्याटप्प्याने वितरित होतील. यंदा प्रथमच कमानीशेजारी प्रवेशद्वारांवर पोलिस आणि आयोजकांकडून ओळखपत्र स्क्रीनिंग मशिन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र व्यक्तींनाच परिसरात प्रवेश मिळणार आहे.