Published on
:
23 Nov 2024, 11:45 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:45 pm
कराड : यापूर्वी ईव्हीएम मशिनबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. आपल्या काही सहकार्यांनीसुद्धा अशीच शंका व्यक्त केली आहे. मात्र, आपणास तसे काहीही वाटत नाही. ईव्हीएम मशिनबाबत आपणास कोणताही पुरावा सापडलेला नाही, असे सांगत कोणी काहीही अर्थ काढला तरी पुरावा सापडल्याशिवाय बोलणे योग्य नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक पराभवानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नाही. महाविकास आघाडीत एकवाक्यता होती. मात्र राज्यासह कराड दक्षिणमध्ये पूर्णपणे अनपेक्षित निकाल लागला आहे. त्यामुळे आता आम्ही आत्मपरीक्षण करणार असून पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. लाडकी बहीण योजना यासह अन्य योजनांचा महायुतीला फायदा झाला की नाही? हे माहीत नाही. हरियाणामधील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे मनोबल वाढले होते.
निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत बदलण्यात आल्यानंतर या निवडणुकीत निवडणूक आयुक्त आहेत की नाहीत? हे स्पष्टपणे जाणवत होते. मात्र, आपण काहीही असले तरी जनतेचा कौल मान्य करतो, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण नेहमीच जनतेच्या सेवेसाठी झटत राहू, अशी ग्वाही दिली आहे.