चिपळूण : चिपळूण येथे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारसभेत बोलताना माजी मुख्यमंत्री व खा. नारायण राणे. सोबत उपनेते सदानंद चव्हाण, डॉ. विनय नातू, चित्रा चव्हाण, राजेश सावंत, उमेश सकपाळ, सुरेखा खेराडे, रामदास राणे आदी.pudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 12:31 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:31 am
चिपळूण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘काँग्रेससोबत जाणार नाही. जर तशी वेळ आली, तर पक्षाचे काम थांबवेन. हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही’ असे स्पष्ट केले होते. मात्र, आज त्यांचे चिरंजीव शरद पवार आणि काँग्रेससोबत गेले आहेत. ते अडीच वर्षांत फक्त दोनदा मंत्रालयात गेले. त्यांना प्रशासन, अर्थव्यवस्था काहीही माहिती नाही. त्यांनी मुख्यमंत्री असताना कोकणला काय दिले? असा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी चिपळुणातील सभेत उद्धव ठाकरे यांना सवाल केला.
शहरातील माटे सभागृहात महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्यासाठी खा. राणे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात लोककल्याणकारी व मराठी माणसाच्या आनंदासाठी महायुती सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. या महायुतीत आ. शेखर निकम 50 हजारांच्या मताधिक्क्यांनी विजयी होतील, असा विश्वास खा. राणे यांनी व्यक्त केला आणि कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली.(Maharashtra assembly poll)
यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार शेखर निकम, शिवसेना उपनेते व माजी आ. सदानंद चव्हाण, डॉ. विनय नातू, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, राजेश सावंत, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ जयंद्रथ खताते, रसिका देवळेकर, दिशा दाभोळकर, श्रीराम शिंदे, विनोद कदम, प्राजक्ता टकले, वसंत ताम्हणकर, प्रशांत मोहिते, मंगेश जाधव, शीतल रानडे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. राणे म्हणाले, आपण राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गशिवाय कुठेही सभा घेणार नाही असे वरिष्ठांना सांगितले होते. निकम चांगला माणूस आहे म्हणून इथे आलो. देशात मोदी सरकार चांगले काम करीत आहे. 2014 मध्ये देश जागतिक आर्थिक व्यवस्थेत अकराव्या क्रमांकावर होता. आता तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. आता दुसर्या क्रमांकावर येण्यासाठी मोदींनी निर्धार केला आहे. अमेरिका, चीननंतर भारताचा नंबर असेल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणली. 1500 चे 2100 रुपये अनुदान केले. मात्र, त्यावर विरोधक टीका करतात; पण तीन हजार रुपये देणार म्हणूनही सांगतात. मात्र, त्यांच्याकडे सत्ताच नाही. त्यामुळे अशा लोकांना सवाल विचारा, असे आवाहन केले. शरद पवार यांना ते म्हणाले, तुम्ही चारवेळा मुख्यमंत्री झालात त्यावेळी बहिणींवर दया का दाखविली नाही? मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा हल्लाबोल चढविला. याप्रसंगी माजी आ. सदानंद चव्हाण, उमेदवार शेखर निकम यांनी मनोगत व्यक्त करून महायुतीच्या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन केले.(Maharashtra assembly poll)