विमानातील तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया विमानातील 100 हून अधिक प्रवाशी गेल्या चार दिवसांपासून फुकेटमध्ये अडकले आहेत. सर्व प्रवाशी फुकेटमधून नवी दिल्लीला चालले होते. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशी तेथेच अडकून पडले आहेत. यादरम्यान एअरलाईन्सकडून कोणताही मदत मिळाली नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 16 नोव्हेंबर रोजी रात्री फुकेटहून नवी दिल्लीसाठी फ्लाइटचे उड्डाण होणार होते. मात्र तांत्रिक समस्येमुळे सुरुवातीला सहा तास उशीर झाला. मग सहा तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, बोर्डिंगनंतर एक तासाने फ्लाइट अचानक रद्द करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना उतरण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, एअर इंडियाने एक निवेदन जारी करत फ्लाईट रद्द झाल्याची कबुली दिली आणि प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. विमानतळावरील आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि जेवण यासह सर्व ऑन-ग्राउंड मदत पुरवली, तर काही प्रवाशांना पर्यायी उपलब्ध फ्लाइट्समध्ये व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांना पूर्ण परतावा मिळण्याचे पर्यायही देण्यात आल्याचे एअर इंडियाने निवेदनात सांगितले.
एअर इंडियाने प्रवाशांना राहण्याचे आश्वासन दिले असले तरी, अनेक प्रवाशांनी हॉटेलची व्यवस्था आणि जेवण मिळण्यात विलंब आणि गोंधळ निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.