एकादशीचे व्रत फलदायी Pudhari File Photo
Published on
:
08 Feb 2025, 12:18 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:18 am
सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या ठिकाणी पवित्रा स्नानासाठी गर्दी उसळली आहे. कुंभमेळ्यात गंगा-यमुनेच्या संगमात स्नान केल्याने पापकृत्यातून मुक्ती मिळते, आपण पवित्र होतो अशी श्रद्धा आहे. अगदी तसेच शारीरिक, मानसिक पावित्र्यासाठी एकादशी गरजेची आहे. एकादशीचे व्रत हे केवळ आध्यात्मिक नसून त्याला सामाजिक, आरोग्यविषयक असे अनेक पैलू आहेत. आजच्या माघ एकादशीच्या निमित्ताने...
जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हती गंगा गोदा, तेव्हा होती चंद्रभागा ।
अशी महती असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपुरात आज (शनिवारी) माघी यात्रेचा सोहळा होत आहे. पंढरपुरात एकूण चार मोठ्या वार्या भरतात. आषाढी ही सर्वात मोठी, त्याखालोखाल मोठी असते ती कार्तिकी यात्रा. त्यापाठोपाठ असते ती माघी आणि त्यानंतर येते ती चैत्री यात्रा. माघ यात्रेची एकादशी ही जया एकादशी म्हणून ओळखली जाते. तसेही दर पंधरा दिवसांनी एक एकादशी असते. त्याला पंढरपूरकर शुद्ध व वद्यातील एकादशी म्हणतात. एकादशीचा उपवास हा फक्त आध्यात्मिक अंगाने न पाहता त्याला सामाजिक, आरोग्यविषयक अशा अनेक अंगांनी पाहायला हवे. कारण, आध्यात्मिक इतकेच या दोन्ही अंगांनी एकादशीचे महत्त्व खूप अमूल्य ठरते.
जनमानसाचे एकत्रीकरण : एकादशीच्या निमित्ताने असंख्य लोक प्रापंचिक व्याप सोडून आध्यात्मिक कारणाने एकत्रित येतात. यातून वैचारिक देवाणघेवाण होते. यावेळी होणार्या समाजप्रबोधनपर कीर्तन, प्रवचनातून वैचारिक घुसळण होते. नैतिक मूल्य, आत्मसंयमाची शिकवण यातून लाभते. यामुळे एकादशीच्या निमित्ताने होणारे हे जनमानसाचे एकत्रीकरण सामाजिक अंगानेही लाभदायी ठरते.
नीतिमत्ता संवर्धन : एकादशीचा उपवास, याकाळातील प्रबोधनात्मक वैचारिक विचार कानावर पडल्याने संयम, नीतिमत्ता, परोपरकार, दानधर्म, सेवा अशा सामाजिक मूल्यांची जाणीव होते. यामुळे समाजात नीतिमत्तेचे संवर्धन होत समाज सन्मार्गी लागतो. शांतताप्रिय होत प्रगतीच्या पथावर अग्रेसर ठरतो.
सांस्कृतिक जपणूक : वारी, कीर्तन, प्रवचन, भजन ही मराठी संस्कृतीची आभूषणं होत. त्या सर्वांचे एकादशीच्या निमित्ताने पुनः पुन्हा आचरण होते, संवर्धन होते. या वारंवारितेमधून सांस्कृतिक जपणूक होते. एकादशीमुळे हा आपला वारसा अधिक वृद्धिंगत होत जातो.
शारीरिक वजन नियंत्रण : आपण रोज आपल्या गरजेपेक्षा अधिकचे अन्न सेवन करतो. यामुळे आपले शारीरिक वजन वाढत जाते; परंतु एकादशीच्या निमित्ताने एकभुक्त राहिल्याने, कमी खाल्याने, दूधहारी, फलहारी, निर्जळी, तुळशीचे पान खाऊन एकादशी केल्याने आपले शारीरिक वजन थोडेफार घटून आपल्यात चपळता येते.
हृदयरुग्णांसाठी फलदायी : हल्ली ताणतणावामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे असेल; परंतु हृदयरुग्णांचे प्रमाण खूपच वाढत आहे. यावर मात करण्यासाठी एकादशीचे व्रत फलदायी ठरू शकते. एकभुक्त व अन्य कडक उपवास केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका थोडाफार कमी होण्यास मदत होते. अर्थात, हा दावा व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो; परंतु हा एक फायदा एकादशीमुळे होऊ शकतो.
पचनसंस्थेस लाभदायी : रोज आपण अधिकचे अन्न शारीरिक गरज नसतानाही पोटात अक्षरशः कोंबतो. त्यामुळे खूप सारे आजार डोके वर काढू शकतात; परंतु आपण एकादशी केल्याने किमान तेवढा एक दिवस तरी पचनसंस्थेस आराम पडून ते आपल्यासाठी लाभदायी ठरू शकते. पोट हलके राहून आपली त्या दिवसाची कार्यक्षमता वाढते. या सर्व लाभाचा विचार करता एकादशीचे व्रत हे सर्वांसाठीच लाभदायी ठरते, हे आपणांस दिसून येते. शारीरिक, मानसिक आरोग्यासाठीही एकादशीचे व्रत फलदायी ठरते.