चिपळूण : एनटीसीच्या प्रधान कार्यालयावर धडक देत तेथील अधिकार्यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधिकार्यांनी निवेदन दिले.pudhari photo
Published on
:
02 Feb 2025, 12:15 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:15 am
चिपळूण शहर : मुंबईतील एनटीसीच्या चार बंद गिरण्यातील कामगारांच्या थकीत पगाराबाबत राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने बेलार्ड पिअर येथील प्रधान कार्यालयावर संतप्त कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली. संघटनेचे अध्यक्ष व आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस व कुंभाली गावचे सुपुत्र गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार पदाधिकार्यांनी धडक दिली व अधिकार्यांना घेराओ घातला.
एनटीसीचे कार्यकारी अधिकारी पी. कुंगुमाराजू यांनी संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळाला सांगितले की, कामगारांचा येत्या दोन महिन्यांत थकीत पगार मिळेल आणि तो पुढे सातत्याने मिळत राहील. यावेळी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनटीसीच्या बेलार्ड पियर येथील प्रधान कार्यालयावर तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकारच्या अखत्यारितील देशभरातील चालू असलेल्या 23 गिरण्या सन 2020 मध्ये कोविडचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या. त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या गिरण्या सरकारला चालवाव्याच लागतील, अन्यथा कामगारांना पगार द्यावाच लागेल, असा सरकारला इशारा देण्यात आला आहे.
बंद गिरणी कामगारांच्या वारसांना अद्याप न्याय नाही
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार आहेत. गिरण्या बंद झाल्यानंतर कामगार व वारसांना अद्याप न्याय मिळालेला नाही. गिरणी कामगारांना घरे व एनटीसीच्या अंतर्गत चार बंद असलेल्या गिरण्यांमधील कामगारांचे थकीत पगार तातडीने मिळावेत, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असल्याचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले आहे.