Published on
:
05 Feb 2025, 12:33 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:33 am
सोलापूर : पाल्याचे शिक्षण, कार्यप्रसंग, आजारपण आदींसाठी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढली जाते. हक्काच्या असलेल्या या रकमेसाठीच आता राज्यासह सोलापूर विभागातील 125 एसटी कर्मचार्यांचे ऑक्टोबरपासून चार कोटी रुपये थकविले आहेत. महामंडळाच्या पीएफ ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाने कर्मचार्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम या ट्रस्टकडे जमा केली नाही. परिणामी, कर्मचार्यांचे हे हक्काचे ट्रस्ट उचक्या देत आहे.
एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकार्यांच्या पगारातून कपात केलेली 1200 कोटींची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. एसटी कर्मचार्यांचे पीएफ व ग्रॅच्युएटीच्या दोन स्वतंत्र ट्रस्ट आहेत. राज्यातील 89 हजार एसटी कर्मचारी व अधिकार्यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे 1200 कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्रॅच्युएटीची अंदाजे 1100 कोटी रुपये अशी मिळून अंदाजे 2300 कोटी रुपयांची रक्कम गेल्या 11 महिन्यांपासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केली नाही.
पीएफ ट्रस्टमधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रक्कमेतून आर्थिक अडचणीच्या वेळी अॅडव्हान्स रक्कम घेतात. पण, 11 महिने ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट असल्याने व सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटीने ट्रस्टमध्ये रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे ऑक्टोंबर 2024 पासून राज्यभरातील एकाही कर्मचार्याला पी. एफ. अँडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. यात सोलापूर विभागातही साधारण 125 कर्मचार्यांना सुद्धा पी. एफ. अँडव्हान्स रक्कमेची मागणी येथील एसटीच्या विभागीय कार्यालयाकडे केली आहे. सर्व मिळून साधारण चार कोटी रुपये इतकी रक्कम ऑक्टोंबर 2024 पासून कर्मचार्यांना मिळाली नाही. त्याचप्रमाणे कर्मचार्यांची वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती रक्कम सुद्धा मिळाली नाही. साधारण 50 लाख रुपये इतकी रक्कम गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना मिळाली नाही.
सरकार कर्मचार्यांच्या वेतनासाठी एसटीला सवलत मूल्य परतावा रक्कम देते. दर महिन्याला सुमारे 360 कोटी रुपये इतकी रक्कम होताना शासनाकडून फक्त 300 कोटी रुपये एसटीला देण्यात येते. त्यामुळे कर्मचार्यांची विविध प्रकारची देणी थकल्याची स्थिती आहे.
एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकार्यांच्या वेतनातून कपात केलेली 1200 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरली नाही. यामुळे राज्यभरातील अनेक कर्मचार्यांना ऑक्टोंबरपासून पीएफ अँडव्हान्स रक्कम मिळाली नाही. यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. पीएफची रक्कम लवकरात लवकर कर्मचार्यांना द्यावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस