दुचाकीवर बसलेल्या महिलेचा भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चाकाखाली सापडून मृत्यू झालाFile Photo
Published on
:
28 Nov 2024, 12:39 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:39 am
कराड : कराडकडे येण्यासाठी लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेल्या महिलेचा भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चाकाखाली सापडून मृत्यू झाला. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेलसमोर हा अपघात झाला असून दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्रियांका अमोल जाधव (वय 31) रा. संजयनगर, मसूर ता. कराड असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनोहर आनंदा नायकवडी (रा. चांभारवाडा जवळ, वाळवा जि. सांगली) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नायकवडी हे दुचाकीवरून घरी वाळवा येथे जात होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते पुणे - बंगळूर महामार्गावर तासवडे टोलनाक्यावर ते आले असता त्याठिकाणी प्रियांका जाधव यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. हे दोघे कराडकडे येत होते. पंकज हॉटेलसमोर पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील वाहनाने नायकवडी यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले. तर प्रियांका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र धडक देणारे वाहन पसार झाले होते. अपघात विभागाचे पीएसआय एम. जी. चव्हाण, धीरज चतुर, कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.