कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने केलेली विकासकामे, स्थानिकांसाठी उभ्या केलेल्या सोयीसुविधा, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, विमानतळ परिसराच्या बाजूला असलेल्या झोपडय़ा आणि इमारती यांच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा, त्यातील अडीच हजार झोपडीधारकांची पात्रता निश्चिती, पाणीपुरवठा, कोरोना काळात उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांमुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशा थेट लढतीत शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पोतनीस यांनी कलिनात अपेक्षेप्रमाणे विजयाची हॅट्ट्रिक साधली.
कलिनात मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन, उत्तर हिंदुस्थानी मतदार अशा मिश्र वस्तीतील मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी पवईतून केवळ निवडणुकीसाठी आयात केलेल्या भाजपच्या अमरजित सिंह यांना मतदारांनी साफ नाकारले. वंचित आणि मनसेच्या उमेदवारालाही मतदारांनी नाकारत शिवसेनेला विजयी केले.