Published on
:
03 Feb 2025, 2:56 pm
Updated on
:
03 Feb 2025, 2:56 pm
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या बालिकेवर अत्याचार आणि तिची हत्या करणारा सैतान विशाल गवळी हा त्याची पत्नी साक्षीसह तुरुंगात आहे. विशालच्या तीन भावांना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशांनुसार साताऱ्याकडे तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलूनही सैतान विशाल गवळीच्या हस्तकांनी नांग्या वर काढल्या आहेत. रविवारी मध्यरात्री तीन बदमाश पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर मध्यरात्री दोन वाजता समोर आले. त्यांनी दहशतीचा अवलंब करत पीडित कुटुंबीयांना शिवीगाळ केली. जामीन झाला नाही तर आम्ही एके 47 घेऊन येतो आणि दाखवतो, अशी धमकीची भाषा केल्याने पीडित कुटुंंबीय दहशतीच्या छायेखाली राहत आहेत.
या प्रकाराने पीडित कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान तीन बदमाश एका दुचाकीवरून पीडित कुटुंबीयांच्या चक्कीनाका येथील घरासमोर आले. त्यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर धिंगाणा घातला. शिवीगाळ करत दगडफेक केली. काही खिळे दरवाजावर ठोकण्याचा प्रयत्न केला, भाजीचे ट्रे फेकून दिले. मोठ्याने ओरडा ओरडा करत हे बदमाश घरासमोर धिंगाणा घालत होते, असे पीडित कुटुंबातील एका सदस्याने प्रसार माध्यमांना सांगितले.
आमच्या माणसांना जामीन झाला नाहीतर आम्ही एके 47 घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो, अशी धमकी या तिन्ही बदमाशांनी पीडित कुटुंबीयांना दिली. घरातील निरागस मुलगी गेल्याचे दुख: समोर असताना पुन्हा गुंडांच्या दहशतीला दिवंगत बालिकेच्या कुटुंबीयांना सामोरे जावे लागत आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या संदर्भात आपण तक्रारी केल्या आहेत. कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी देखिल केल्याचे या सदस्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी विशाल गवळीच्या तिन्ही गुंड भावांना सातारा भागात तडीपार केले असले तरी ते चोरून-लपून कल्याणमध्ये राहत असल्याचे पीडित कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. घराबाहेर तरूणांनी केलेल्या धिंगण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचेही या सदस्याने सांगितले.