महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकालात महाविकास आघाडीला मोठे अपयश आले आहे. महाविकास आघाडीचा खेळ 50 जागातच आटपला. महाविकास आघाडीत शिवसेना ( उबाठा ) पक्षाला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. या दारुण पराभवानंतर काँग्रेस आत्मचिंतन करायला तयार नाही असं वातावरण आहे. आता या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ट नेते माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस आपल्या पराभवातून कोणताही धडा शिकत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यावर माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी यावेळी सांगितले की काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना सुनावलेल्या खड्या बोलाची आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आजही आपण सत्तेत असल्याचे वाटते आहे. काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले आहेत. निवडणुकीतील पराभवानंतरही ते पेटून का उठत नाहीत? असा सवाल प्रा. वसंत पुरके यांनी केला आहे. ते अकोला येथे आले असता पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. तर काँग्रेसने आज राज्यभरात निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा आणि राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा-जिल्ह्यात मोठ्या नेत्यांच्या पत्रकार परिषद आयोजित केल्या होत्या. त्यासाठी ते अकोल्यात आले होते.
हे सुद्धा वाचा
संपूर्ण विदर्भात दौरा करणार – वसंत पुरके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपची देखील स्तुती केली आहे. ते सतत 60 वर्षे हरल्यानंतरही निराश झाले नाहीत. दोन खासदारांपासून सुरुवात करून ते आता सत्तेत पोहोचल्याचा दाखलाही त्यांनी दिला आहे. मग काँग्रेस एक-दोन निवडणुका हरल्यानंतर निराशेच्या गर्तेत का गेलीय ? असा सवाल केला आहे. आपण काँग्रेस कार्यकर्त्यांमधील निराशा झटकण्यासाठी लवकरच संपूर्ण विदर्भात दौरा करणार असल्याचे प्रा. वसंत पुरके यांनी म्हटले आहे.