पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
Published on
:
24 Nov 2024, 1:27 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:27 am
कागल ः कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे. 11 हजार 879 इतक्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांना 1 लाख 43 हजार 828 इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला. त्यांना एक लाख 31 हजार 949 मते मिळाली. एकूण 26 फेर्या झाल्या. सुरुवातीच्या दोन फेरीमध्ये समरजित घाटगे यांना अत्यल्प मताची लीड वगळता कोणत्याही फेरीमध्ये त्यांना आघाडी घेता आली नाही.
बहुजन समाज पार्टीकडून अशोक शिवशरण, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे समरजित घाटगे, महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, मनसेचे रोहन निर्मळ, वंचित बहुजन आघाडीचे धनाजी सेनापतीकर यांच्यासह अपक्ष म्हणून अॅड. कृष्णाबाई चौगुले, पंढरी पाटील, प्रकाश बेलवाडे, राजू कांबळे, विनायक चिखले, सातापराव सोनाळकर असे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांच्यातच खरी लढत झाली.
मतदारसंघांमध्ये अतिशय मतदान झाले. टोकाचा संघर्ष ही झाला सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात आला आरोप प्रत्यारोप आणि गेली महिनाभर संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला होता. राज्यस्तरीय नेत्यांच्या सभाही घेण्यात आल्या होत्या. एकमेकांवर व्यक्तिगत आरोप देखील टोकाचे करण्यात आले होते. संघर्ष टीकेला गेलेला होता. प्रचारामध्ये लाडकी बहिणींचा मुद्दा प्रकर्षाने पुढे करण्यात आला होता. उमेदवारांचे सर्व कुटुंबिय प्रचारात उतरलेले होते. दोन्ही उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्यात आली होती. आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.
सांगाव रोडवरील जवाहर नवोदय विद्यालय येथे मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता टपाली मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू झाली. सैनिकी मतदार, होम व्होटिंग आणि निवडणूक कर्मचारी, पोलिस, होमगार्ड आदींचे टपाली मतदान एकत्रित करण्यात आले. सैनिकांच्या मतपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू करण्यात आले. दरम्यान सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष इव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ झाला.
मतमोजणीच्या ठिकाणी नवोदय विद्यालयाच्या दोन्ही बाजूला दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात आले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच दोन्ही उमेदवारांची समर्थक नवोदय विद्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी घेण्याकरता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. क्षणाक्षणाला आकडेवारीमध्ये कार्यकर्ते गुंतले होते. फेरीचा निकाल जसा लागेल तसे कार्यकर्ते विजयाच्या घोषणा देऊन जल्लोष करत होते. प्रत्येक फेरीला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. पहिल्या फेरीत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी पहिल्या सुरुवातीला पहिल्या तीन फेरीमध्ये अत्यल्प मताची आघाडी घेताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊ लागले मात्र नंतरच्या प्रत्येक फेरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येते. त्यानंतर घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण होत होती. मतमोजणीसाठी गेलेले कार्यकर्ते निराश होऊन प्रत्येक फेरीला बाहेर पडत होते.
पहिल्या फेरीत समरजित घाटगे 1133 ची आघाडी घेतली. त्यानंतर दोन फेर्यांमध्ये मुश्रीफ 2494 मताची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या फेरीमध्ये 92 आणि 227 मताची आघाडी घेत मुश्रीफ यांच्या मताची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर झालेल्या सर्व फेर्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात आघाडी घेत मुश्रीफ यांनी विजयाकडे वाटचाल केली. अखेर हसन मुश्रीफ यांनी 11879 मतांनी विजयाचा षटकार मारला तर समरजित घाडगे यांनी एवढी मते मिळवत दुसर्या क्रमांकावर राहिले, त्यांना पराभवाचा दुसर्यांदा सामना करावा लागला. दरम्यान, घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊन केंद्र बाहेर जाणे पसंत केले. धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. कसबा सांगाव मतदारसंघासह जिल्हा परिषद मतदारसंघासह कागल शहर शहरामध्ये झालेल्या मतदानामध्ये हसन मुश्रीफ यांना आघाडी मिळाल्याने कागल शहरासह व इतर परिसरातील गावांमध्ये मताधिक्य मिळेल, या आशेवर कार्यकर्ते होते; मात्र कोणत्याच ठिकाणी फारसे मताधिक्य मिळाले नसल्याने त्यांची वाटचाल पराभवाकडे झाली.
कागल तालुक्यातील 17 फेरीमध्ये प्रत्येक फेरीत मुश्रीफ यांनी मताधिक्य घेतले. 17 आणि 18 या फेरीमध्ये 7344 इतक्या निर्णायक मताची आघाडी घेतली. त्यानंतर कोणत्याही फेरीमध्ये घाटगे यांना मताधिक्य मिळाले नाही. गडहिंग्लज शहरासह उत्तुर, कौलगे, कडगाव या मतदारसंघांमध्ये देखील त्यांचा फारसा प्रभाव चालला नाही. या मतदारसंघावर घाटगे यांचा भरवसा होता, मात्र त्यांना फारसे यश आले नाही. घाडगे यांना केवळ 22 व्या फेरीमध्ये 78 मतांची आघाडी मिळालेली होती.
मतमोजणीमध्ये लक्षणीय आघाडी घेतल्यानंतर 19 व्या फेरीनंतर हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करण्यास सुरुवात केली. खर्डेकर चौकातील पक्षाच्या कार्यालयामध्ये हसन मुश्रीफ हे तळ ठोकून होते. मतमोजणीच्या ठिकाणाहून मतमोजणीची माहिती घेत होते, तसेच राज्यातील निवडणुकीचे चित्रही पाहत होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खर्डेकर चौक, गैबी चौकामध्ये गुलाल आणि फटाक्याचे आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी देवदेवतांचे दर्शन घेण्याकरता तिथून बाहेर पडले व थेट ते मतमोजणीचे ठिकाणी दाखल झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेऊन जल्लोष केला.
कागल मतदारसंघात पुरुष 171356, महिला 172311 व इतर 5 असे एकूण 343672 मतदारांपैकी पुरुष 143169 (83.55 टक्के), महिला 140395 (81.48 टक्के) व इतर 4 (80 टक्के) अशा एकूण 283568 (82.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला होता. यापैकी मतदारांनी हसन मुश्रीफ यांना एक लाख 43 हजार 828 मते देत विजयी केले. प्रतिस्पर्धी समरजि घाटगे यांना एक लाख 31 हजार 949 इतकी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अमरदीप वाकडे व गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे समीर माने यांनी काम केले.
वाळवे खुर्द, कसबा सांगावात मुश्रीफांना लीड
वाळवे खुर्द या एकाच गावात मुश्रीफ यांना 1000 मताची लीड मिळाले. या गावातील माजी जिल्हा परिषद भूषण पाटील हे मुश्रीफ गटाकडे तर बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे घाटगे गटाकडे होते. कसबा सांगाव येथे मुश्रीफ यांना एक हजार मताची लीड मिळाले तर मौजे सांगाव 1000 मते कमी मिळाली. मुश्रीफ गटाचे नेते युवराज पाटील यांचे पुतणे राम कृष्ण हरी यांनी निवडणुकीच्या वेळी घाटगे गटात प्रवेश केला होता
बहुतांशी मतदारांची मुश्रीफांना पसंती
शाहू साखर कारखाना परिसरातील मतदारांनी समरजित घाटगे यांना थोडीफार लीड दिले. ते वगळता इतर कोणत्याही भागात लीड मिळालेले नाही. कागल तालुक्यासह गडहिंग्लज आजरा या तालुक्यातील बहुतांशी गावांतील मतदारांनी मुश्रीफांना पसंती दिली.
सात निवडणुका आणि सहा विजय!
यापूर्वी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी एकूण आठवेळा निवडणूक लढवली होती. त्यापैकी सहा निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. पालकमंत्री मुश्रीफ यांनी आतापर्यंत एकूण सातवेळा निवडणुका लढविल्या. त्यापैकी सलग सहावेळा त्यांनी विजय मिळविला. गेल्या 25 वर्षांच्या आमदारकीपैकी मुश्रीफ 19 वर्षे मंत्रिपदी राहिले आहेत.