पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करताना सुंदरगिरी महाराज, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ व मान्यवर.Pudhari Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:25 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:25 am
खटाव : ना पोलिस गाड्यांचा ताफा, ना वाजणारा सायरन, ना कोणता डामडौल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी कुणालाच माहित न होता मोजक्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी लीन झाले. अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याने बोललेला नवस फेडून आणि सेवागिरी देवस्थानच्या पदाधिकार्यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्याचा शब्द देवून अजितदादा पुढे मार्गस्थ झाले.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातून अजित दादांचा एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजय व्हावा, असा नवस माळेगाव साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण पाटील यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी केला होता. अजितदादा निवडणुकीत एक लाखाहून अधिकच्या मताधिक्याने निवडूनही आले. गेली 45 वर्षे नेहमी श्री सेवागिरी दर्शनाला येणार्या ढवाण पाटलांनी बोललेला नवस फेडण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुसेगावात आले. अजितदादांच्या दौर्याबाबत ना प्रशानाला माहिती होती ना पोलिसांना कोणती कल्पना होती. त्यांच्याबरोबर पोलिस गाड्यांचा ताफाही नव्हता.
पुसेगावात आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिराला भेट देऊन संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, माळेगाव साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तानाजीराव देवकाते, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, संजय काटे, मंगेश जगताप, पंकज भोसले, देवस्थानचे सचिव विशाल माने व ग्रामस्थ उपस्थित होते.