लातूर (Latur):- 2022 ला केवळ बदली प्रक्रियेसाठी तात्पुरती प्रतिनियुक्ती झालेले शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगावचे गुरुजी शिक्षण अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने चक्क शिक्षण विभागाचे (Department of Education) ‘कलेक्टर’ झाले. शिक्षणाचा पॅटर्न घडविणाऱ्या लातूर जिल्ह्यात जूनपासून या शाळेचे विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षकाची वाट पाहत आहेत. जून महिन्यापासून आतापर्यंत एक शैक्षणिक सत्र उलटून गेले मात्र शिक्षण विभागाचे 2022 सालाचे बदली सत्र मात्र काही संपता संपत नाही.
शिक्षणाचा पॅटर्न घडविणाऱ्या लातूरमध्ये जूनपासून विद्यार्थी पाहताहेत शिक्षकाची वाट!
‘आंधळं दळत अन् कुत्रं पीठ खातं’, असा प्रकार जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्रशासनात सुरू आहे. त्याचे झाले असे की, 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षक विभागाने एक कार्यालयीन आदेश 21 मार्च रोजी काढला. कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी जी प्रक्रिया राबवायची, ती राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची ‘वानवा’ असल्याने काही ‘हुशार’ कर्मचारी नियुक्त करण्यासाठी हा आदेश काढला असावा. त्यानुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यातून एका शिक्षकाला या बदली प्रक्रियेसाठी लातूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती देण्यात आली. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी ही प्रतिनियुक्ती देण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात त्या वर्षाखेरपर्यंत बदली प्रक्रिया पार पडली नाही. मात्र या कामासाठी नियुक्त केलेले पिपळगावचे गुरुजी हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात लातूरच्या मुख्यालय ठाण ठोकून राहिल्या आहेत. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिल्याने या गुरुजींना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात आत्तापर्यंत काम करण्याची महान संधी मिळाली आहे.
प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या या तोंडी आदेशाच्या परिणामामुळे तिकडे हिप्पळगावमध्ये मात्र जून महिन्यापासून सुरू झालेले शैक्षणिक सत्र विद्यार्थ्यांसाठी कोरडेठाक ठरले आहे. आपले गुरुजी आज येतील, उद्या येतील, या आशेने या शाळेचे विद्यार्थी दररोज शाळेत यायचे. मात्र असे करता-करता एक महिना, दोन महिने, नव्हे, तर शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपून गेले. मात्र गुरुजी काही शाळेत आलेच नाहीत.