NEET Exam | पेन-पेपर पद्धतीने एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये 'नीट' होणारfile photo
Published on
:
18 Jan 2025, 4:45 am
Updated on
:
18 Jan 2025, 4:45 am
मुंबई/नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट (यूजी) आता ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये पेन आणि पेपर पद्धतीने ही परीक्षा होणार असल्याचे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शुक्रवारी जाहीर केले.
ही परीक्षा पेन आणि पेपर घ्यायची की नाही यावर शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी एनटीएने अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) ठरवल्यानुसार, नीट युजी २०२५ ची परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने (ओएमआर आधारित) एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येईल, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. गेल्या वर्षी नीटच्या पेपर फुटीमुळे देशभरात गोंधळ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१९ पासून, एनटीए राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करीत आहे. सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेतली जाते. २०२४च्या मेमध्ये २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट दिली होती आणि निकाल जुलै २०२४ मध्ये जाहीर करण्यात आला होता.
२०२५ च्या 'नीट'चे स्वरूप कसे असेल?
यंदाची नीटदेखील एमबीबीएस, बीएएमएस बीयुएमएस बीएचएमएस यांसारख्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा असेल. परीक्षेचा कालावधी ३ तास २० मिनिटांचा असेल. बहुपर्यायी स्वरूपाचे (एमसीक्यू) २०० प्रश्न असतील व उमेदवारांना १८० प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक योग्य उत्तरास ४ गुण मिळतील आणि चुकीच्या उत्तरावर १ गुण वजा केला जाईल. १३ भाषांमध्ये ही नीट होईल.