कुंभमेळा, नाशिकला ‘मेरी’ची 100 एकर जागा साधुग्रामसाठी घेण्याचीही तयारी सुरू:जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांचे तातडीने जागा पाहणीचे आदेश
2 hours ago
1
दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वधिक चर्चेचा मुद्दा असलेल्या साधुग्रामसाठी आता महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटची (मेरी) १०० एकर जागा घेण्याची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहण करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असले तरी ऐनवेळी निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करत, मेरीच्या जागेची देखील पाहणी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (३१ जानेवारी) बैठक झाली. साधूग्रामला अधिकाधिक जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये तीन प्रमुख आखाडे असून, त्यांचे खालसे निवासी साधू महंतांसाठी साधुग्रामची उभारणी केली जाते. यंदा साधुग्रामसाठी सुमारे ४०० एकर क्षेत्रावर उभारणी प्रस्तावित आहे. दरम्यान नो डेव्हलपमेंट झोन असलेल्या या भागातील जमीन मिळण्यास उशीर झाल्यास, त्याचा परिणाम कुंभमेळ्यावर होऊ शकतो. या बाबींचा विचार करत, डवले यांनी साधुग्रामसाठी मेरीच्या जागेची चाचपणी करण्याचा प्रस्ताव मांडला. याठिकाणी १०० एकर जागा उपलब्ध असून तिचा उपयोग सोयीस्कर होईल आणि सवारीसाठीही ही जागा योग्य ठरू शकते, असे डवले यांनी निर्देश दिले. कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या संदर्भात प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याचे अवलोकन करतांना, डवले यांनी सांगितले की, केवळ कागदावर चित्र रंगवण्याऐवजी प्रत्यक्ष फील्डवर काय आवश्यकता आहे याचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांचा विकास करत असताना, गर्दीवर नियंत्रण आणि व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित करूनच नियोजन करणे आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील घाट व मलजल शुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी मागील कुंभमेळ्यात पुरेसा वेळ मिळाला नव्हता, अशी खंत डवले यांनी व्यक्त केली. मलजल शुद्धीकरणाचे काम अवघ्या पंधरा दिवसांत पूर्ण केले होते, तर चार महिन्यात नवे घाट बांधले होते. यंदा मात्र, वेळ उपलब्ध आहे. मलजल शुद्धीकरणाचे पाणी घाटाबाहेर सोडण्यासाठी आतापासूनच काम सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनाची सादरीकरण केली. गोदाकाठ परिसरात पाच नवीन पुलांचे बांधकाम करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आदी उपस्थित होते. कुशावर्तात दिवसाला पाच लाखांची क्षमता नाशिक : प्रयागराज महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटना पाहता आपल्याकडेही त्र्यंबकेश्वरमध्ये अत्यंत कमी जागा आहे. येथे गर्दी नियोजनावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पर्वणीच्या दिवशी २५ ते ३० लाख भाविक येण्याचा अंदाज असून त्या तुलनेत शहराची क्षमता नसून, कुशावर्तात दिवसाला ४ ते ५ लाख भाविक स्नान करू शकतात. या सर्व बाबी लक्षात घेता फील्डवर वारंवार जाऊन पाहणी करा, त्यानुसार आराखडा तयार केला तर आपलाच आत्मविश्वास वाढतो अन् सोहळाही यशस्वी होईल, अशा सूचना एकनाथ डवले यांनी केल्या. शहरातील मोकळ्या जागांमध्ये वाढ करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्र्यंबकेश्वर शहरातील मलजल शुद्धीकरण केंद्राचे पाणी नदीपात्रात मिश्रीत होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कुंभमेळ्यासाठीच्या पायाभूत सुविधा कामांचा प्राधान्यक्रम ठरविताना आतापासून त्याला वरिष्ठस्तरावर गांभीर्याने गती द्यावी, असेही ते म्हणाले. कार्यालयांचे स्थलांतर : गेडाम त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी यावर बैठकीत बराच काळ चर्चा झाली. जगभरातून येणाऱ्या भाविकांचा शहरी भागात वावर राहणार आहे. त्याचा आतापासूनच विचार केला पाहिजे. म्हणून शहराच्या मुख्य भागातील काही शासकीय कार्यालयांचे स्थलांतरण करुन त्या जागा भाविकांसाठी खुल्या करण्याबाबत चाचपणी करण्यात येईल, असे डॉ. प्रविण गेडाम यांनी डवलेंना सांगितले. सीसीटीव्ही अत्यंत महत्त्वाचे प्रयागराजचा अनुभव लक्षात घेताे नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्येही कुंभमेळ्यासाठी भाविक येतील. त्यामुळे गर्दीचे नियोजन हा मुख्य अजेंडा डोळ्यासमोर ठेवताना त्यादृष्टीने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्हीची यंत्रणा सक्षम करावी. एखाद्या भागात गर्दी वाढण्याची शक्यता असल्यास सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये पंधरा मिनिटे अगोदर त्याची माहिती कशी मिळेल याअनुषंगाने यंत्रणा उभी करावी, अशा सूचना डवले यांनी केल्या.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)