पीएमपीच्या ताफ्यात लवकरच 400 सीएनजी बस File Photo
Published on
:
01 Feb 2025, 3:40 am
Updated on
:
01 Feb 2025, 3:40 am
पुणे: पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी महिन्यापासून भाडेतत्वावरील 400 सीएनजी बस दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे रोजच्या गर्दीतून होणार्या प्रवासाची कटकट आणि बससाठी होणारे वेटींग काही प्रमाणात का होईना, कमी होणार आहे. परिणामी, पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात येणार्या भाडेतत्त्वावरील या चारशे बसपैकी 121 बस अशोक लेलँडच्या तर 279 टाटाच्या असणार आहेत. फेब्रुवारी 2025 महिन्यापासून या बस ताफ्यात घेण्याचे असणार आहे. याकरिता आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून करण्यात आली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या 1 हजार 880 बस आहेत. त्यापैकी 1 हजार 568 बस दररोज मार्गावर प्रवासी सेवा पुरवतात. पुर्वी पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या 2 हजारपेक्षा अधिक होती. मात्र, आयुर्मान संपलेल्या बस स्क्रॅप केल्यामुळे बस गाड्यांची संख्या कमी झाली आहे.
बसची संख्या कमी झाली. मात्र, प्रवाशांची संख्या वाढतच आहे. परिणामी, बससाठी वेटींग आणि गर्दीतील जीवघेणा प्रवास, आणि गर्दीचा फायदा घेत होणार्या चोर्यांचा त्रास पीएमपी बस प्रवाशांसाठी रोजचाच झाला आहे.
यामुळे पीएमपीकडील बस संख्या वाढवणे आवश्यक झाले आहे. आता या 400 बस दाखल होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे शहराची लोकसंख्या पाहाता आवश्यक बससंख्या पीएमपीकडे नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
आत्ताच्या घडीला पुणेकरांसाठी पीएमपीच्या ताफ्यात 3 हजारपेक्षा अधिक बस असणे आवश्यक आहे. यानुसार पीएमपी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. आगामी काळात बसच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ होईल, असा विश्वास पीएमपी अधिकार्यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.
असे आहे बस खरेदीचे नियोजन...
एक ठेकेदार - 93 (टाटा मार्कोपोलो)
दुसरा ठेकेदार - 93 (टाटा मार्कोपोलो)
तिसरा ठेकेदार - 93 (टाटा मार्कोपोलो)
चौथा ठेकेदार - 121 (अशोक लेलँड)
एकूण भाडेतत्त्वावरील सीएनजी बस - 400 बस
आम्ही भाडेतत्त्वावरील 400 सीएनजी बस खरेदीचे नियोजन केले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंतिम पाहणी देखील झाली आहे. फेब्रुवारीपासून टप्याटप्प्याने या बस ताफ्यात आणण्यात येणार आहेत.
-सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.