Published on
:
07 Feb 2025, 12:28 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:28 am
कोल्हापूर : यंदाच्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी परीक्षेत जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गैरप्रकारास उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि गैरप्रकारात सामील अशांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत. संवेदनशील केंद्राचे ड्रोनमार्फत चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच कॉपी झालेले केंद्र कायमचे रद्द होणार आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. याप्रसंगी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव ऑनलाईन उपस्थित होते.
2018 पासून मागील पाच वर्षांत झालेल्या बोर्ड परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले आहेत, त्या सर्व केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येत आहेत. चालू वर्षीच्या परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येथील, अशा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार आहे. शिवाय ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या 34 तर बारावीच्या 23 परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी इतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून नेमण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील दहावीच्या 2 व बारावीच्या 4, सातारा जिल्ह्यातील दहावीच्या 17 व बारावीच्या 12 केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलण्यात आले आहेत. कोल्हापूर विभागात दहावीची 357 व बारावीची 176 अशी 533 केंद्रे आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 73 हजार, सांगली जिल्ह्यातील 72 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लक्ष 5 हजार असे सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.