Published on
:
04 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:40 am
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन हे केवळ 740 कि.मी.मध्ये रेल्वे गाड्याच चालवत नाही, तर अभियांंत्रिकी क्षेत्रासह कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशभरातील जवळपास 16 ते 17 राज्यांमध्ये कार्यरत आहे. मागील वर्षापासून कोकण रेल्वेचा मार्ग हा देशात 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झालेला रेल्वे मार्ग झाला आहे. यामुळे डिझेलऐवजी विद्युतीकरणामुळे इधन खर्चात आधीच्या तुलनेत वर्षाला 190 कोटी रुपयांची आर्थिक बचत होऊ लागल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.
कोकण रेल्वेकडून सोमवारी येथील क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक कार्यालय येथील काजळी क्लबमध्ये आयोजित पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना झा यांनी ही माहिती दिली. यावेळी कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता आर. नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर तसेच रत्नागिरी विभागीय व्यवस्थाप शैलेश बापट उपस्थित होते.
यावेळी सी.एम.डी. श्री. झा पुढे म्हणाले की, आता कोकण रेल्वे 100 टक्के विद्युतीकरण झालेली असल्याने प्रदूषणविरहित आणि ‘ग्रीन रेल्वे’ झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
कोकण रेल्वे ही केवळ ही केवळ तिच्या हद्दीत ट्रेनच चालवत नाही तर देशातील 9 रेल्वे झोनमध्ये रेल्वे रुळ टाकण्याचे काम, अभियांत्रीकी क्षेत्रातील कामे जसे की, भुयारी मार्ग बांधणे, रेल्वे मार्ग, पूल, विद्युतीकरण आदी क्षेत्रात कोकण रेल्वे काम करीत आहे.
भारत-नेपाळला जोडणार्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी...
जम्मू-काश्मिरमध्ये चिनाब नदीवर आयफेल टॉवरपक्षेही उंच पूल कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्यातून साकारला आहे. भारत-नेपाळ जोडणार्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देखील कोकण रेल्वेवर सोपवण्यात आली आहे.
प्रवासी सुविधांनाही प्राधान्य
प्रवासी सुविधांनादेखील कोकण रेल्वे प्राधान्य देत आली आहे. याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांमध्ये गाडीच्या प्रतीक्षेतील प्रवाशांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह लाऊंज’ची सुविधा पुरवण्यात आली आहे. रत्नागिरी क्षेत्रात खेड तसेच चिपळूण येथील स्थानकामध्ये सर्व कॅटेगरीतील प्रवाशांसाठी अत्यंत माफक शुल्कात एक्झिक्युटिव्ह लाऊंज सुरू करण्यात आली आहे. केवळ 50 रुपये प्रतितास इतके हे शुल्क असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक वर्षी 7 ते 8 एक्झिक्युटिव्ह लाऊंज उभारण्याची रेल्वेची योजना आहे, अशी माहितीदेखील ‘कोरे’चे सीएमडी संतोष कुमार झा यांनी दिली.