महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणात आठ महिन्यांनंतरही तब्बल 85.59 टीएमसी मुबलक पाणीसाठा असतानाचे सकारात्मक छायाचित्र.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:45 am
पाटण : एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जल वर्षातला आठ महिन्यांचा कालावधी आता संपला आहे. त्यानंतरही महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
यावर्षी पावसाळ्यात धरणात तब्बल 179.41 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे जूनपासूनच्या आजवरच्या आठ महिन्यात सिंचन व वीज निर्मितीसाठी 46.58 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्याचवेळी वापर न करता धरणातून 59.30 पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यानंतरही सध्यस्थितीत 85.59 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्यातील चार महिन्यांमध्ये भासणारी सिंचन व वीज निर्मितीसाठी आवश्यक पाण्याबाबतची सर्व चिंता मिटली आहे.
मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे कोयनेत ऐतिहासिक असा सिंचनासाठी तब्बल 38.14 टीएमसी पाणी वापर झाला होता. तर पश्चिम वीज निर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पाणी वापराला कात्री लावण्यात आली होती. त्यामुळे केवळ 57.22 टीएमसी पाण्यावरच पश्चिम वीज निर्मिती झाली होती. यावर्षी मुसळधार पावसामुळे धरणाची तांत्रिक स्थिती मजबूत आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या नव्या तांत्रिक जलवर्षात 18 टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर सुरुवात झाली. त्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल 179.41 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत पश्चिम वीज निर्मितीसाठी 29.25 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. तर सिंचनासाठी 8.33 टीएमची पाण्याचा वापर झाला आहे.
पूरकाळातील 9.10 व विनावापर सोडलेले 59.30 अशा एकूण 105.98 टीएमसी पाण्यानंतरही धरणात सध्यस्थितीत 85.59 टीएमसी पाणी शिल्लक आहे. पश्चिम वीज निर्मिती व सिंचनाचा पाणीवापर लक्षात घेता आगामी काळात सिंचनासाठी सरासरी 27 टीएमसी तर पश्चिम वीज निर्मितीसाठी 38 टीएमसी पाण्याची गरज आहे. मृतसाठा पाच अशा एकूण 70 टीएमसी पाण्याची आगामी चार महिन्यात गरज आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्याच्या वीज व सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असणार्या कोयना धरणात सध्या तब्बल 85.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने कोयना धरण सार्वत्रिकद़ृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे या तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.