कोल्हापूर : गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. राधिका जोशी, एस. एस. मोरे आदी. Pudhari File Photo
Published on
:
04 Feb 2025, 12:54 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:54 am
कोल्हापूर : प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्याद्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) राबविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.
शेंडा पार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत याबाबत बैठक झाली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित अधिकार्यांना सूचना केल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत सीपीआर येथे या शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात 50 शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यानंतर रुग्णसंख्येचा विचार करून पुढील शस्त्रक्रियासाठी शिबिर आयोजित केले जाईल.
संपूर्ण निःशुल्क असलेल्या या शस्त्रक्रियेबाबत संबंधित रुग्णांनी सीपीआर येथील ओपीडी 107, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तथा अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात याबाबत आपली नोंदणी करावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया ही विनाछेद शस्त्रक्रिया असून, यामध्ये कुठल्याही प्रकारची शरीराची चिरफाड न करता शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णांना हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशय याबाबतची शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय अधिकार्यांनी सल्ला दिला आहे, त्या रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी या मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. डॉ. मुफ्फझल लकडावाला हे डॉ. मुफी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतातील प्रसिद्ध लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. बॅरिएट्रिक आणि गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमध्ये विशेषज्ञ असून, ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक आहेत. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, मुंबई येथील जनरल आणि मिनिमल अॅक्सेस सर्जिकल सायन्स विभागाचे शस्त्रक्रिया संचालक आहेत. त्यांच्या 20 हून अधिक वर्षांच्या सरावात त्यांनी 2019 मध्ये ‘अमेरिकन सोसायटी फॉर मेटाबॉलिक अँड बॅरिअॅट्रिक सर्जरी’तर्फे जगातील सर्वोत्कृष्ट सर्जन पुरस्कार आणि इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ द वर्ल्ड मास्टर एज्युकेटर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 हजारांहून अधिक जीव वाचवणार्या शस्त्रक्रिया केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
26 वर्षांपर्यंत मुलींच्या गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी प्रयत्न
गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी 26 वर्षांपर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सीएसआर फंडातून ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक (एचपीव्ही) ही लस देण्यात येणार आहे. वयानुसार किशोरवयीन मुलींची नावे आणि माहिती संकलित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.