Published on
:
28 Nov 2024, 12:41 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:41 am
कोल्हापूर : निवडणुकीत विकासाच्या घोषणांचा पाऊस पडला. आता येणार्या काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा नव्या घोषणांचा पाऊस पडणार आहे. पुढचे वर्ष हे कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकांचेच वर्ष असेल. भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मार्चपूर्वी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
या निवडणुका कधी होणार, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी कार्यकर्त्यांना कायम तयार राहावेच लागते. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला, तर कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागतील. आता जिल्ह्यातील एक हजार पैकी 463 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत; तर पुढीलवर्षी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळच्या निवडणुका होणार असल्या तरी ठराव दाखल करण्यातून होणारे शक्तिप्रदर्शन राजकीय ताकद दाखविणारे ठरणार आहे. त्याशिवाय सहकारी बँका व सहकारी संस्थांच्याही निवडणुका नवीन वर्षात असणार आहेत.
वर्चस्वासाठी रंगणार संघर्ष
कोल्हापूर महापालिकेवरील वर्चस्वासाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष होणार आहे. इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यानंतर तेथे पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. तेथेही असाच सामना होईल. जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी व महायुतीत सामना होईल, तर पंचायत समितीमध्ये त्या त्या तालुक्यात नव्याने निवडून आलेले आमदार व त्यांचे विरोधक यांच्यातील संघर्ष कडवा असेल.
जिल्ह्याचे बलाढ्य आर्थिक गड असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक 2021 मध्ये जानेवारी व मेमध्ये झाली होती. या निवडणुका 2026 मध्ये होणार असल्या तरी त्याच्या मतदानकरिता ठराव दाखल याचवर्षी करावे लागणार असल्यामुळे त्या निवडणुकांचे रिंगणही नव्या वर्षात सुरू होणार आहे.
463 ग्रामपंचायतींच्या निवडणुका
जिल्ह्यात आता 463 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. सर्वसाधारणपणे मोठी गावे सोडली, तर स्थानिक नेते या निवडणुकीत लक्ष घालत नाहीत. स्थानिक विकास आघाड्या यामध्ये सक्रिय असतात. गावपातळीवर त्याचे नियोजन केले जाते.