खडकी पोलीस ठाण्यातील फौजदार अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
अण्णा बादशहा गुंजाळ (35) असे आत्महत्या केलेल्या फौजदाराचे नाव आहे. लोणावळ्यातील शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत लटकल्याची माहिती पोलिसांना 112 या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर मिळाली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक क्रेटा मोटार उभी होती. शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला. कारची माहिती घेतली असता कारमालकाचे नाव अण्णा गुंजाळ असल्याचे समजले. त्या गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क केल्यानंतर ही कार अण्णा गुंजाळ यांचीच असून, ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
गुंजाळ हे तीन दिवसांपासून गैरहजर होते आणि त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार होती. त्यापूर्वीच त्यांच्या आत्महत्येचा प्रकार समोर आला. घटनास्थळाजवळील कारमध्ये पोलिसांना एक डायरी सापडली आहे. ती ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तपास करीत आहेत.