Published on
:
24 Nov 2024, 1:28 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:28 am
राज्यात सर्वत्र महायुतीची घोडदौड चालू असताना करमाळा माढा मध्ये मात्र महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांनी विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिंदेंना पराभूत केले आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील संजयमामा शिंदे यांचा झालेला पराभव हा जिव्हारी लागणार आहे. करमाळा तालुक्या बरोबरच माढ्यातील 36 गावातील मतदारांनीही आमदार संजय शिंदे यांना नाकारले आहे. सुरुवातीला सर्वत्र अटीतटीची वाटणारी निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात मात्र एकतर्फी होत गेली.
करमाळकरांशी तुटलेला जनसंवाद हा संजय शिंदे यांच्या बद्दल नाराजी वाढवणारा ठरला आहे. महायुती कडून संजय मामा शिंदे यांना तिकीट मिळत असतानाही पक्षीय तिकीट घेण्याऐवजी मुस्लिम दलित तसेच अल्पसंख्यांक मतदारांच्या मतावर डोळा ठेवून अपक्ष निवडणूक लढवण्याचा त्यांचा डाव फसला. कारण मोहोळच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा धर्म सोडून दिग्विजय बागल यांना पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
त्यातच करमाळ्यात भाजपचे गणेश चिवटे यांनी युती धर्म सोडून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे ऐवजी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा मोठा शक्ती प्रदर्शन करत त्यांनी घेतला होता. त्यामुळे संजय मामा शिंदे हे महायुतीचेच आहेत की काय असा प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाला होता. याबरोबरच विरोधकांनीही अपक्ष उमेदवार शिंदे हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उमेदवार आहेत असा प्रचार जोरदार केल्याने व त्यासाठी यापूर्वी त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगितल्याने मुस्लिम दलित व अल्पसंख्यांक मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. याबरोबरच तालुक्यातील लहान लहान छोटे गट आणि विखुरलेल्या गटातील लोकांना एकजूट करण्यात त्यांना अपयश आले होते. त्यामुळे प्रथमदर्शनी मजबूत वाटणारा व विकासाकडे जाताना दिसणारा संजय मामा शिंदे यांचा गट विखुरला गेला.
2019 मध्ये संजय मामा शिंदे यांच्या खांद्याला खांद्या लावून लढणारा माजी आमदार जयवंतराव जगताप गट तसेच कै. सुभाष सावंत यांचा गट यंदा संजय मामा शिंदे यांच्याबरोबर राहिला नाही. तांत्रिक कारणाने हा गट त्यांच्यापासून दुरावला. हा गट जोडताना संजयमामा शिंदे यांना अपयश आले. त्यातच त्यांनी जगताप गटामधील माजी सरपंच दादा जाधव, अण्णासाहेब पवार, दत्तात्रय अडसूळ, रोहिदास सातव आदी मजबूत पुढार्यांना आपलेसे केले. एक-दोन सभेमधून जगताप सावंत यांच्यावर जोरदार टीकाही केली त्यानंतर मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप, सुनील सावंत, राहुल सावंत यांनी संजयमामा शिंदे यांच्या विरोधात मोट बांधली. राज्यभर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेवटपर्यंत ठोस भूमिका न घेतल्याने मराठा समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे मराठा समाजाचे मते एकवटली नाहीत. त्यांनी सर्वच गटांना मतदान केल्याचे दिसते.