गुहागर : भास्कर जाधव यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.pudhari photo
Published on
:
24 Nov 2024, 12:00 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:00 am
गुहागर : गुहागर मतदारसंघातून उबाठा शिवसेना नेते आ. भास्कर जाधव 2,830 मतांनी विजयी झाले. जाधव यांना एकूण 71 हजार 241 मते मिळाली तर महायुतीचे पराभूत उमेदवार राजेश बेंडल यांना 68 हजार 411 मते मिळाली. या विजयामुळे आ. भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघातून सलग चौथ्यावेळा निवडून आले आहेत. काही काळ महायुतीचे पराभूत उमेदवार बेंडल यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने निकाल राखून ठेवण्यात आला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांची मागणी फेटाळत भास्कर जाधव यांना विजयी घोषित केले. शिवसेना ठाकरे गटाकडून कोकणातून भास्कर जाधव हे एकमेव विजयी ठरले आहेत.
या मतदारसंघात जाधव विरुद्ध बेंडल यांच्यात चुरशीचा सामना झाला आणि अवघ्या 2830 मतांनी जाधव विजयी झाले. तिसर्या क्रमांकावर मनसेचे प्रमोद गांधी यांना 6652 मते मिळाली. गुहागर मतदारसंघातील निवडणूकअटीतटीची झाली. पहिल्या तीन फेर्यात भास्कर जाधव यांची आघाडी होती. मात्र पुढील फेर्या अटीतटीच्या झाल्या. 23 फेर्यांची मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये शांतता होती. अखेरच्या 2 फेर्यांमध्ये आ. जाधव यांचे मताधिक्य तुटू शकत नाही, असे लक्षात आल्यावर जाधव समर्थक कार्यकर्ते जल्लोष करु लागले. आमदार जाधवही मतमोजणी पूर्ण झाल्यावरच मतदान केंद्रात आले. महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल मात्र पराभव दिसत असूनही मतमोजणीच्या शेवटची फेरी सुरू असताना मतमोजणी कक्षात आले होते.