Published on
:
02 Feb 2025, 12:25 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:25 am
सावंतवाडी ः दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी तसेच गोव्याला पाण्याची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन कुडासे येथे फुटलेल्या तिलारी उजव्या कालव्याचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर चालू आहे. शनिवार सायंकाळपर्यंत काम पूर्ण करून रविवार 2 फेब्रुवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. दुरूस्ती कामाचा दर्जा चांगला असून पाईप व काँक्रीटमध्ये स्टीलचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिली.
चराठे येथील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. जाधव म्हणाले, घोटगेवाडी येथील फुटलेल्या जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यास थोडा अवधी लागेल. कारण जलवाहिनी सुरळीत करण्यासाठी लोखंडी चॅनेलचे वेल्डिंग, त्यांचे फाऊंडेशन यासाठी किमान वेळ लागतो. मात्र, फुटलेल्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 21 जानेवारी रोजी रात्री 10 वा. घोटगे येथील तिलारी कालवा किमी. 9 मधील केर जलसेतूचा पहिला डरिप (ॠठझ झळशि र्र्अिींरवरलीं) कोसळल्याचे निदर्शनास आले. सदर जलसेतूचे दगडी बांधकाम हे 25 ते 30 वर्षांपूर्वी झाले आहे. यापूर्वी 10 जानेवारी 2024 रोजी जलसेतूच्या एका डरिप मधून गळती निदर्शनास आल्यामुळे तत्काळ त्याची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला होता. 4 मे 2024 या दिवशी सदर जलसेतूच्या दुसर्या डरिप मधून गळती निदर्शनास आली होती. दोन्ही घटनांवेळी शेतकर्यांकडून होणारी पाण्याची मागणी लक्षात घेता तातडीने या जलसेतूची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्ती कामामध्ये प्रामुख्याने गंजलेले डींशशश्र र्ढीीीीशी पूर्णपणे बदलण्यात आले होते.
24 जानेवारी रोजी तिलारी डावा कालव्या वरील पाईप मोरीतून गळती होऊन कालव्याच्या भरावाची माती वाहून गेली, या गळतीमुळे कालव्याचे पाणी पाईप मोरीतून आजूबाजूच्या परिसरात शेतामध्ये तसेच मणेरी- कुडासे रस्त्यावर पसरले. तिलारी कालव्याची बांधकामे सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 1984 ते 1995 या कालावधीत झालेली आहेत, मोरीच्या ठिकाणचे पाईप कमकुवत झाले आहेत. त्यामुळे मोरीतील एक पाईप फुटून त्यावरील भराव खचला. कालव्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असलेने कालव्याचा 2 ते 3 मी. लांबीतील भराव वाहुन गेला.
तिलारी कालवे हे जुने झाले आहेत. कालव्याची माती ही पाण्याला धरून ठेवण्यासाठी सक्षम नाही, त्यामधुन पाझर होऊन व पाइपिंग होऊन अशा घटना घडतात. सर्व कालव्यांचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आहे. त्यास मान्यता मिळून गोवा राज्याच्या धर्तीवर त्याची निविदा प्रक्रिया होऊन पावसाळ्यानंतर सदर कालवा नूतनीकरण काम हाती घेण्यात येणार आहे. कालवा कामांविषयी काहीही शंका असल्यास विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.
कालवा दुरूस्ती कामाबाबतची माहिती पालकमंत्री नितेश राणे व दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक अभियंता यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.