Published on
:
22 Jan 2025, 12:07 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:07 am
बीजिंग : चीनमधील एका इन्स्टिट्यूटने एकाच दिवसात लिक्विड ऑक्सिजन केरोसिन इंजिनच्या तीन यशस्वी चाचण्या केल्या आहेत. आगामी अंतराळ मोहिमा अधिक किफायतशीर करण्यासाठी या चाचण्या महत्त्वाच्या आहेत. यामुळे चीनच्या भविष्यातील अंतराळ मोहिमा कमी खर्चात आणि यशस्वीरित्या होऊ शकतील. त्यामध्ये चंद्रावरील मोहिमांचाही समावेश आहे.
स्वस्त उत्पादने बनवण्याबाबत जगात चीनचा हातखंडा आहे, हे आपल्याला माहिती आहेच. आता अंतराळयानांचे इंधनही असेच स्वस्त बनवण्यासाठी चीनची धडपड सुरू आहे. चीनने सध्या अमेरिकेप्रमाणेच रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्येही आपली वेगळी ओळख बनवली आहे. अलीकडेच चीनने स्पेस लाँचिंगशी निगडीत खर्च कमी करण्यासाठी एक नवा प्रयोग केला. हे तंत्रज्ञान लुनार मिशन म्हणजेच चांद्रमोहिमांचा खर्च कमी करण्यासाठीही महत्त्वाचा आहे. भारतही सध्या अशाच तंत्रज्ञानात प्रगती करत आहे. चीनने आता याबाबतचा प्रयोग यशस्वी केला आहे. चीनची ‘165 इन्स्टिट्यूट’ ही चीनच्या एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या सहाव्या अकादमीचा हिस्सा आहे. या इन्स्टिट्यूटने एकाच दिवसात तब्बल तीन वेळा लिक्विड ऑक्सीजन केरोसिन इंजिनच्या यशस्वी चाचण्या घेतल्या. हे यश चीनला अतिशय लाभदायक ठरणार आहे. पुढील पिढीच्या लाँचिंग व्हेईकलसाठी प्रॉपल्शन इंजिन विकसित करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. चीनचे हे यश त्यांच्या अंतराळ कार्यक्रमांना अधिक चालना देणारे ठरेल. या इंजिन कॉम्बिनेशनसह चीनच्या रॉकेट स्पेसमध्ये 500 टन पेलोड वाहून नेण्यासाठीची क्षमता येऊ शकते. तसेच लिक्विड ऑक्सिजन केरोसिन इंजिनच्या वापराने चीनच्या अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होऊ शकतो. चीनने गेल्या वर्षीही चार इंजिनच्या पॅरॅलल इग्निशनची चाचणी घेतली होती. त्यामध्येही अशा इंधनाचा वापर केला होता. सर्वसाधारणपणे सॅटेलाईट आणि अंतराळयान घेऊन जाणार्या रॉकेटच्या इंजिनमध्ये आग टिकवून ठेवण्यासाठी केवळ इंधनच नव्हे तर ऑक्सीजनचीही आवश्यकता असते. अशावेळी लिक्विड ऑक्सिजन ऑक्सिडायझरचे काम करते, जे रॉकेट टेक्नॉलॉजीसाठी गरजेचे ठरते. विशेषतः मीडियम क्रायोजेनिक इंजिनसाठी ते महत्त्वाचे असते. यामुळे रॉकेटची शक्तीही वाढते, शिवाय या दोन्ही वस्तू सहजपणे साठवून ठेवता येऊ शकतात.