खेड : जगबुडी नदी किनारी असलेला भंगाराचा डोंगर. ( छाया : अनुज जोशी)
Published on
:
04 Feb 2025, 1:20 am
Updated on
:
04 Feb 2025, 1:20 am
खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत भरणे परिसरात जगबुडी नदी किनारी एका भंगार व्यावसायिकाने चक्क भंगार साहित्याचा डोंगरा एवढा साठा केला असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भरणे ग्रामपंचायत, प्रशासकीय यंत्रणा व महसूल विभाग याबाबत मौन बाळगून असून, कोकणात दररोज खेडहून गोव्याकडे व गोव्याहून मुंबईकडे जाणारे पर्यटक व प्रवासी हा प्रकार पाहून तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावे व कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
खेड तालुक्यातील भरणे परिसर हा दिवसेंदिवस दाट लोकवस्तीचा परिसर बनू लागला आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम झाल्याने येथे विकासाला गती मिळाली आहे. परंतु त्या सोबतच या परिसरात नागरी समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. भरणे ग्रामपंचायत या भागातील सांडपाणी निचरा व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करताना दिसत नाही. त्यामुळे येथे अनेक भंगार व्यवसायिक त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. जगबुडी नदी किनारी राष्ट्रीय महामार्ग परिसरातच एका भंगार व्यवसायिकांने प्लास्टिक, काचेच्या वस्तू यांचा मोठा साठा केला आहे.
एका बाजूला बारमाही पिण्याच्या पाण्याच्या स्रोत असलेले सुंदर जगबुडी नदी तर तिच्याच बाजूला हा भांगाराचा डोंगर पाहताना निसर्गप्रेमी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नदी किनारा त्यामुळे पूर्णपणे प्रदूषित होत आहे. या परिसरातच खेड शहराला पाणी पुरवठा करणारी जॅकवेल देखील आहे. परंतु या भागात आता धोकादायक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. एका बाजूला महसूल विभाग जागेच्या वाणिज्य वापराबाबत सजगता दाखवत असताना या भंगार डेपो व्यवस्थापनाला काही नियम नियमावली महसूल विभाग दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती आरोग्य विभाग, महसूल विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आरोग्य विभाग डेंग्यूबाबत गंभीर आहे का?
खेडमध्ये गेल्या दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना करत कारवाईच्या पोकळ धमक्या देत आहे. परिणामी भरणे परिसरात जगबुडी नदी किनारी कचर्याचा एवढा मोठा डोंगर उभा राहिला असून, आगामी काळात येथील प्लास्टिकच्या कचर्यात पाणी साचून डेंग्यू आळ्या निर्माण होऊन डास उत्पत्ती होऊन मानवी जीवन धोक्यात आल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.