Published on
:
18 Jan 2025, 12:49 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:49 am
जत : जत तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. शहाजान काशिम नदाफ (वय 46, रा. जत) व शिवाजी किसन कोळी (30, रा. कुंभारी) अशी मृतांची नावे आहेत. विजय संभाजी क्षीरसागर (28) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी ः शहाजान नदाफ हे सांगली रस्त्यावर शहरापासून जवळच असणार्या एका ढाब्यासमोर राहत होते. गुरुवारी रात्री शहरातील काम आटोपून ते दुचाकीवरून (एमएच 16 एस 7106) घराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी क्रीडा संकुलाजवळ आली असता मागून कवठेमहांकाळकडे भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने (एमएच 10 झेड 0796) त्यांच्या दुचाकीला उडविले. या अपघातात शहाजान नदाफ गंभीर जखमी झाले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला.
दुसर्या घटनेत शिवाजी कोळी व विजय क्षीरसागर हे मोटरसायकलवरून कुंभारीहून जतकडे जात होते. कुंभारी गावाजवळ विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला ठोकरल्याने शिवाजी कोळी यांचा मृत्यू झाला, तर विजय क्षीरसागर गंभीर जखमी झाले. जखमी विजय यांना तातडीने उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला. घटनास्थळी उभा असलेला ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी, नेमका अपघात कोणत्या वाहनाने झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत.