Published on
:
22 Jan 2025, 12:30 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:30 am
सोलापूर : शाळामध्ये आधार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची मागणी वाढली आहे. महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयात दाखले काढण्यासाठी गर्दी होत आहे. नागरिकांची झोन कार्यालयातून दाखले घेण्यासाठी ससेहोलपट होत आहे. जेवणाची सुट्टीची वेळ संपली तरी कर्मचारी निवांत बसून असतात. कार्यालय कुलूप बंद असल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागते. दाखल्यासाठी आलेल्यामध्ये महिला आणि लहान बालकांचा समावेश होता.
महानगरपालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी विभागाबरोबर सर्व झोन कार्यालयात जन्ममृत्यू दाखले देण्याची सोय केली आहे. सर्व ठिकाणी स्वतंत्र मनुष्यबळ देखील दिले आहे. त्यासाठी संगणक प्रणालीच्या माध्यमातून हे दाखले ऑनलाईन वितरित केले जातात. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी देखील जन्म दाखले काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. जन्ममृत्यू विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. महापालिकेत येणार्या सर्व कर्मचार्यांची कार्यालयीन कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आहे. अर्धा तास लंच ब्रेक असताना दाखले वितरित करणारे कर्मचारी लंच ब्रेकची वेळ निघून गेली तरीही कार्यालय कुलूप बंद अवस्थेत ठेवत असल्याने नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी झोन कार्यालय सहा येथील दाखले वितरित करणार्या विभागासमोर काही महिला आणि नागरिक चक्क ठाण मारून बसले होते. महापालिकेने अशा महिलांसाठी हिरकणी कक्षाची या ठिकाणी स्थापन केला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या महिलांना उघड्यावरच आपल्या बाळांना स्तनपान करावयाची नामुष्की आली.
अनेक दिवसांपासून जन्म दाखला काढण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील कारभार ढिसाळ आहे. कर्मचार्यांची वर्तणूक व्यवस्थित नाही. निष्काळजीपणामुळे दाखला मिळण्यास वेळ लागत आहे. अशा तक्रारी दाखले काढण्यासाठी येणार्या नागरिकांच्या आहेत.