Published on
:
25 Nov 2024, 11:47 pm
Updated on
:
25 Nov 2024, 11:47 pm
लंडन : एखाद्या व्यक्तीचे लोकेशन जाणण्यासाठी आता जीपीएसची अजिबात गरज असणार नाही, असा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांनी आता असे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टूल विकसित केले आहे, जे वातावरणानुरूप एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या बॅक्टेरियासारख्या सूक्ष्म जीवाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा ठावठिकाणा कुठे आहे, त्याची बिनचूक माहिती देऊ शकेल.
स्वीडनमधील लूंड विद्यापीठातील संशोधकांच्या या अभ्यासानुसार, मनुष्याच्या शरीरावरील सूक्ष्म जीव वातावरण व ठिकाणाच्या हिशेबाने बदलत राहतात. एआय टूल आता हे सांगू शकेल की, सदर व्यक्ती समुद्र किनार्यावर आहे, रेल्वे स्टेशनवर आहे की एखाद्या हॉटेल किंवा पार्कवर आहे. या टूलचा वापर करण्यासाठी विशेष प्रकारचे गॅझेट आवश्यक असेल. भविष्यात मोबाईलवरून देखील याचा वापर करणे शक्य होणार आहे. या तंत्रात मोबाईल स्क्रीनमध्ये बदल केले जाणार आहे, जे अंगठ्यावर असणार्या सूक्ष्म जीवाची ओळख पटवून देण्यासाठी सक्षम असतील.
संशोधकांनी या एआय टूलला प्रशिक्षित करण्यासाठी विभिन्न क्षेत्रातील मायक्रोबायोम डेटाचा वापर केला. त्यांनी 53 शहरातील वातावरण, 18 देशातील मातींचे 237 आणि पाण्याचे 131 नमुने एकत्रित केले. या नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर एआय मॉडेल तयार केले. हे तंत्र संसर्गजन्य आजाराचा मूळ स्रोत शोधण्यासाठी देखील अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरू शकते, असा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांनी शोधलेले हे तंत्र मायक्रोबायोम जियोग्राफिकल पॉप्युलेशन स्ट्रक्चर अर्थात एम-जीपीएस या नावाने ओळखले जाते. हे तंत्र सूक्ष्म जीवांची ओळख निश्चित करून त्या जागेचे विश्लेषण करते. पारंपरिक जीपीएसच्या तुलनेत ही पद्धती अगदीच विभिन्न स्वरूपाची आहे. संशोधक एरन एल्हाईक यांनी सदर तंत्र विभिन्न भागौलिक परिस्थितमध्ये आढळून येणार्या सूक्ष्म जीवाच्या आधारावर विकसित केली गेली असल्याचे याप्रसंगी सांगितले.