‘जीबीएस संसर्गजन्य नाही; राज्यात आजार नियंत्रणात'pudhari photo
Published on
:
04 Feb 2025, 4:34 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:34 am
पुणे: शहरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, हा आजार संसर्गजन्य नाही. यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच, राज्यात या आजारांवर लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ऑनलाइन बैठकीत सांगितले.
या वेळी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सविस्तर आढावा घेत विविध विभागांच्या अधिकार्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यामध्ये ज्या ठिकाणी जीबीएस रुग्णसंख्या वाढत आहेत, त्या भागात प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी.
कुकुटपालन व्यवसाय असलेल्या परिसराला भेटी द्याव्यात. पाणीपुरवठा आणि शुद्धीकरण विभागाने विशेष जलशुद्धीकरण मोहीम राबवावी. ज्या ठिकाणी पाइपलाइन दुरुस्तीची गरज असेल तिथे ती तत्काळ करण्यात यावी तसेच मागील दोन महिन्यांतील पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक बाबींचा आढावा घ्यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले.
सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या एसओपीचे पालन करावे, असे सांगत रुग्णांना फिजिओ थेरेपीसोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ला देण्याच्या सूचना जे. पी. नड्डा यांनी दिल्या. पुण्यातील जीबीएस रुग्णाबद्दलची इत्थंभूत माहिती केंद्र सरकारला दिली आहे. राज्यातील जीबीएस परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून, पुणे महापालिका आणि राज्य सरकार समन्वय साधून यासाठी त्या सर्व उपाययोजना करत आहेत, अशा सूचना माधुरी मिसाळ यांनी दिल्या.
‘जीबीएस’चे राज्यात 168 रुग्ण
गुलेन-बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोमवारी 10 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आत्तापर्यंतची रुग्णसंख्या 168 इतकी झाली आहे. यातील 86 समाविष्ट गावांतील, 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, 18 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील, तर 8 इतर जिल्ह्यांतील आहेत, जे पुण्यात उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 47 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, 47 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. एकूण रुग्णांपैकी 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
राज्याच्या पशुपालन विभागानेही विविध ठिकाणचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये पाण्याचे 22 ठिकाणचे नमुने, मातीचे 11 ठिकाणचे नमुने, कोअॅकल स्वॅबचे 35 नमुने, ट्रॅकियल स्वॅबचे 39 नमुने आणि फिकलचे 12 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.
महापालिकेने 43 हजार 793 हजार घरांमध्ये जाऊन 1 लाख 31 हजार 175 नागरिकांची आरोग्याची माहिती घेतली आहे. त्यामध्ये अतिसाराची लागण झालेले 168 जणांची नोंद करण्यात आली असून, त्यांचे शौच नमुने, रक्त नमुने आणि लघवीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही अन्नाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत आहेत. या वेळी पोल्ट्रीचे 63 नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. याशिवाय महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून दूषित मांस, सी फूड यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून, 11 नमुने कोंढवा येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून, तो निगेटिव्ह आहे.