Published on
:
01 Feb 2025, 12:18 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:18 am
सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील पाण्याच्या टाकीचा परिसर हा तळीरामांचा अड्डा बनलेला आहे. दुपारपासूनच येथे तळीरामांचा घोळका जमायला सुरू होतो. याकडे पालिका प्रशासनातील अधिकार्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.
जुळे सोलापूर परिसरात पाण्याच्या टाकीचा परिसर मोठा व विस्तीर्ण आहे. या ठिकाणी मोठमोठी झाडे आहेत. शिवाय जमिनीखाली व जमिनीवर विहिरी असल्याने हा परिसर थंड आहे. यामुळे उन्हाळात तर येथे लोकांची गर्दी असते. मात्र अलिकडे मात्र शहरातील विविध भागातील टवाळखोर मुलांचा वावर वाढलेला आहे. ही टवाळाखोर मुले घोळक्याने येथील टाकीखाली आणि झाड़ांच्या सावलीखाली बसून बिनधास्तपणे दारू पितात. यापूर्वी या तळीरामाकडून येथील गवताला आग लावल्याचीही चर्चा होती. या टाकीला लागून येथे विजापूर नाका पोलीस ठाण्याची पोलीस चौकी आहे. या तळीरामांना या पोलिसांची कसलीही भीती नाही. शिवाय या परिसरात काही अक्षेपार्ह वस्तू पडल्याचे दिसत आहेत. या परिसरात श्री वैभव लक्ष्मी माता मंदिर, बंथनाळ मठ यासह अनेक मंदिरे असल्याने महिलांसह नागरिकांची वर्दळ असते.
शहराच्या पार शेळगीपर्यंत येथील पाणी गेले आहे. येथे असलेल्या भूमिगत पाण्याच्या टाक्यांना व्यवस्थित झाकणही नाही. या तळीरामाकडून नशेमध्ये एखादी चुकीची घटना घडल्यास पालिकेला मोठी किंमत मोेजावी लागेल. या टाकीच्या परिसराच्या चारही बाजूला संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण नाही. असलेली तारेची कुंपण कुचकामी आहे. असंख्य ठिकाणी ती तुटलेली आहे. यामुळे येथे कोणालाही सहजासहजी येण्या जाण्यापासून रोखणारी यंत्रणा नाही. रंगीत पाणी रिचवत बसलेल्यांना अटकाव करणे गरजेचे आहे.
वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली आहे. तसेच येथील पोलिस चौकीला सुध्दा एक पत्र देऊन पेट्रोलिंग करण्याविषयीचा कळवणार आहे. शिवाय चोवीस तास सुरक्षा रक्षक देण्याविषयी देखील संबंधितांशी चर्चा झाली.
- अखिल महाडिक, सहायक स्थापत्य शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग