Published on
:
24 Nov 2024, 12:16 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:16 am
ठाणे : महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महायुतीने विजयाचे वादळ आणले आहे. महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीमध्ये तब्बल 1 लाख 20 हजारांचे मताधिक्य घेऊन केदार दिघेंचा पराभव केला. कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीच्या नजीब मुल्ला यांचा 96 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.
ठाण्यात भाजपच्या संजय केळकर यांनी 57 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. संजय केळकर यांना 1 लाख 19 हजार 353, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे राजन विचारे यांना 61 हजार, तर मनसेच्या अविनाश जाधव यांना 42 हजार मते मिळाली. कोपरीत एकनाथ शिंदे यांना 1 लाख 59 हजार 60, तर ठाकरे शिवसेनेच्या केदार दिघे यांना 38 हजार मते मिळाली.
ओवळा माजीवडात शिंदे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना 1 लाख 70 हजार, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे नरेश मणेरा यांना 69 हजार 963 मते मिळाली. मनसेच्या संदीप पाचंगे यांना या मतदारसंघात 11 हजार 991 मते मिळाली.
कळवा मुंब्रात शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना 1 लाख 57 हजार 141, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना 60 हजार 913, तर मनसेचे सुशांत सूर्यराव यांना 13 हजार, तर एमआयएमचे सर्फराज खान यांना 13 हजार 519 मते मिळाली आहेत.
मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता
मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी गीता जैन आणि मुझफ्फर हुसेन यांच्यावर मात करत मोठा विजय मिळवला. महायुतीच्या मेहता यांना 1 लाख 27 हजार 180, तर काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांना 74 हजार 942, तर मागच्या वेळी निवडून आलेल्या अपक्ष गीता जैन यांना केवळ 20 हजार मते मिळाली आहेत.
गणेश नाईक यांना 70 हजारांचे मताधिक्य
ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक 70 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना 26 व्या फेरीअखेर 1 लाख 13 हजार, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेनेचे बंडखोर विजय चौगुले यांना 44 हजार 102, तर महाविकास आघाडीचे एम. के. मढवी यांना 31 हजार मते मिळाली आहेत.
कल्याण डोंबिवलीच्या चारही जागा महायुतीकडे
कल्याण डोंबिवलीच्या चार विधानसभा जागांपैकी चारही जागा महायुतीने जिंकल्या आहेत. कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी 26 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना एकूण 81 हजार 516 मते मिळाली. गायकवाड यांना गोळीबार केलेले महेश गायकवाड यांनी शिंदे गटातून बंडखोरी केली होती. त्यांनी 55 हजार मते घेत दुसर्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळवला, तर महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे यांना 39 हजार मते मिळाल्याने ते तिसर्या क्रमांकावर फेकले गेले.
डोंबिवलीचा गड रवींद्र चव्हाण यांनी राखला असून त्यांना 77 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी एकूण 1 लाख 23 हजार मते घेतली आहेत. ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीही आहेत. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी 46 हजार मते मिळवली आहेत, तर वंचितच्या सोनिया इंगवले यांनी 1,500 मते घेतली आहेत.
कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात महायुतीने मनसेचा पराभव करत महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी 66 हजारांचे मताधिक्य घेऊन विजय संपादन केला. विद्यमान आमदार राजू पाटील यांना 74,249, तर महाविकास आघाडीचे सुभाष भोईर यांना 69,561 मते मिळाली आहेत. ते या मतदारसंघाचे माजी आमदार होते, तरीही ते तिसर्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
कल्याण पश्चिममध्ये शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर 18 व्या फेरीअखेर 1 लाख 2 हजार 371 मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन बासरे यांनी 67 हजार 541 मते मिळाली होती. मनसेचे उल्हास भोईर यांना 18 हजार 700 मते मिळाली होती. त्यामुळे 18 व्या फेरीअखेर भोईर यांना 35 हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
भिवंडी विभागात तीन विधानसभा मतदारसंघ येत असून भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे शिवसेनेचे शांताराम मोरे 57 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांना 1 लाख 27 हजार मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे महादेव घाटाळ यांना 69 हजार मते मिळाली, तर मनसेच्या वनिता कथोरे यांना 13 हजार, अपक्ष उमेदवार मनीषा ठाकरे यांना 24 हजार मते मिळाली.
भिवंडी पश्चिममध्ये महायुती
भिवंडी पश्चिममध्ये महायुतीने आपला गड राखला आहे. भाजपचे विद्यमान आमदार महेश चौगुले यांनी 31 हजार मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना एकूण 70 हजार मते मिळाली. समाजवादी पार्टीचे रियाज आझमी यांना 38 हजार, तर काँगे्रसचे दयानंद चोरगे यांना 21 हजार मते मिळाली. एमआयएमच्या वारीस पठाण यांना 15 हजार मते मिळाली. महाविकास आघाडीतील बंडखोरी आणि एमआयएमच्या उमेदवारामुळे येथे महायुतीचा विजय सोपा झाला.
समाजवादी पार्टीकडे भिवंडी पूर्व
समाजवादी पार्टीने भिवंडी पूर्वचा गड कायम राखला आहे. सपाचे रईस शेख यांना 51 हजारांचे मताधिक्य मिळाले असून त्यांना 1 लाख 19 हजार, तर शिंदे शिवसेनेचे संतोष शेट्टी यांना 67 हजार आणि मनसेचे मनोज गुळवे यांना 1 हजार मते एवढी अत्यल्प मते मिळाली.
ठाण्यामधील उल्हासनगर, मुरबाडचा गड भाजपने कायम राखला. मुरबाडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना 52 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यांना 1 लाख 75 हजार, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुभाष पवार यांना 1 लाख 23 हजार एवढी मते मिळाली आहेत. मनसेच्या संगीता चेंदवणकर यांना 7 हजार 800 मते मिळाली.
उल्हासनगरमध्ये कुमार ऐलानी हे विद्यमान आमदार 30 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 82 हजार मते मिळाली, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ओमी कलानी यांना 51 हजार 477 मते मिळाली, तर मनसेच्या भगवान भालेराव यांना 4 हजार 900 मते मिळाली.
शहापूरमध्ये अजित पवार गटाच्या दौलत दरोडा यांनी आपली जागा राखली आहे. त्यांना या मतदारसंघात 1 हजाराचे निसटते मताधिक्य मिळाले आहे. त्यांना एकूण 73 हजार 81 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांना 71 हजार 409 मते मिळाली, तर जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा यांना 42 हजार 776, तर मनसेच्या हरिश्चंद्र खांडवी यांना 5 हजार 648 मते मिळाली.
मंदा म्हात्रे 374 मतांनी विजयी
बेलापूर विधानसभा मतदारसंघात विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. महायुतीच्या मंदा म्हात्रे या 146 मताधिक्याने पुढे होत्या, तर महाविकास आघाडीचे संदीप नाईक हे मागे होते. नाईक यांना 89 हजार 183, तर भाजपच्या मंदा म्हात्रे यांना 89 हजार 329 मते मिळाली होती. शिंदे शिवसेनेचे बंडखोर विजय नहाटा यांना 18 हजार 400 मते मिळाली होती. शेवटी मंदा म्हात्रे 374 मतांनी विजयी झाल्या.