डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत प्रचंड वाढ झाली आहे.
Published on
:
18 Jan 2025, 12:33 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:33 am
कोल्हापूर : मोबाईल फोन, टीव्ही आणि संगणक यांसारख्या डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या (ड्राय आय सिंड्रोम) समस्येत प्रचंड वाढ झाली आहे. पापण्यांची उघडझाप कमी झाल्याने अश्रुग्रंथी निष्क्रिय होत असून डोळ्यात अश्रूच येईनासे झाले आहेत. या समस्येचे प्रमाण वाढत असून कोल्हापूरही यात मागे नाही. डोळ्यांत जळजळ, लालसरपणा आणि अस्पष्ट दिसणे यांसारख्या तक्रारी घेऊन रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यांत येत आहेत. पूर्वी ही समस्या फार दुर्मीळ मानली जायची. स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम किंवा जोग्रेन सिंड्रोमसारख्या आजारांशी संबंधित लोकांनाच हा त्रास व्हायचा. मात्र, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आता ही समस्या सामान्य झाली आहे.
अश्रू गोठण्याचे नेमके कारण काय?
डोळे कोरडे होणे ही समस्या अश्रू ग्रंथी निष्क्रिय होऊन पुरेसे अश्रू निर्माण होत नाहीत किंवा डोळ्यातील अश्रूंची लवकर वाफ होते. नेत्रतज्ज्ञांच्या मते, स्क्रीनकडे एकसारखे पाहिल्यामुळे पापण्यांची नैसर्गिक हालचाल कमी झाली आहे. तसेच, मिबोमियन ग्रंथींचे कमी होणारे कार्य हे देखील यासाठी कारणीभूत आहे. या ग्रंथी अश्रूंच्या तेलकट थरासाठी आवश्यक असलेले द्रव्य तयार करतात. या थराशिवाय अश्रूंची लवकर वाफ होतात आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवतो.
डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांच्या ताणाचे आणि डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. कोल्हापूरमध्येही याचे प्रतिबिंब दिसत आहे. स्थानिक नेत्रतज्ज्ञांच्या मते, डोळे कोरडे होण्याच्या तक्रारी घेऊन अनेकजण दवाखान्यांत येत आहेत. आधी रुग्ण फारच कमी असायचे, पण आता ही समस्या रोज आढळत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात या समस्येची प्रचंड वाढ झाली आहे, असे एका स्थानिक नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. वेळीच उपचार झाले नाहीत, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणे, बुब्बुळाच्या पृष्ठभागाला इजा होणे आणि दृष्टी लवकर अधू होण्यासारखे परिणाम संभवतात.
परिणामांपासून वाचण्यासाठी उपाय
20-20-20 नियम पाळा : दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब पाहा.
वारंवार पापण्या हलवा : स्क्रीन वापरताना पापण्या हलवण्याची सवय लावा.
डोळ्यांना ओलावा द्या : मेडिकलमध्ये मिळणारे डोळ्यांचे ड्रॉप्स वापरा.
लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा : त्यांना मैदानी खेळांकडे वळवा आणि डिजिटल उपकरणांचा वापर कमी करा.
सामान्यतः आपण एका मिनिटात 15-20 वेळा पापण्या हलवतो. मात्र, स्क्रीनकडे पाहात असताना ही संख्या अर्ध्याहून कमी होते. त्यामुळे अश्रू डोळ्यात नीट पसरत नाहीत आणि वाफ होऊन डोळे कोरडे पडतात.
डॉ. आर. बी. ओडीयार, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ