Published on
:
02 Feb 2025, 12:18 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:18 am
जगाच्या पाठीवरील कोणत्याही उत्पादनाची हुबेहूब नक्कल करून ते ‘मेड इन चायना’ असा शिक्का मारून चीन जगभरात त्याची विक्री करतो. त्याची गुणवत्ता भलेही बेतास बात असेल, पण किंमत कमी ठेवून ही चिनी उत्पादनं मूळ उत्पादनाला कडवी झुंज देताना दिसतात. ‘डीपसीक’नं ही परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध कमालीचे तीव्र बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवरही ‘डीपसीक’नं घडवून आणलेली उलथापालथ महत्त्वाची आहे.
लियांग वेनफेंग हे नाव ऐकलंय? असा प्रश्न काल-परवापर्यंत कुणाला विचारला असता तर ‘कोणऽऽऽ?’ असं उत्तर ऐकायला मिळालं असतं. पण गेल्या आठवडाभरामध्ये जगाच्या कानाकोपर्यापर्यंत या नावाची चर्चा झाली आहे आणि होत आहे. हल्ली समाज माध्यमांमुळं प्रसिद्धी मिळवणं किंवा प्रसिद्ध होणं ही फारशी नवलाईची बाब राहिलेली नाहीये. अशाप्रकारे काहीजण रातोरात टिकटॉक स्टार बनलेले आपण पाहिले आहेत. लियांग वेनफेंग हेही अशाच प्रकारच्या ‘हटके मार्गाचा’ अवलंब केल्याने चर्चेत आले असले तरी त्यांचा मार्ग जगाची दिशा बदलणारा ठरला आहे. हे महाशय चीनमधील ‘एआय डेव्हलपर’ असून त्यांच्या डीपसीक कंपनीनं दोन एआय प्रोग्राम आणि चॅटबोट सादर केले असून या नव्या आविष्कारांनी अमेरिकेसह सर्वच देशांच्या आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या विश्वातील दिग्गज कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. इतकंच नव्हे तर डीपसीकचं हे एआय मॉडेल लाँच झाल्याची घोषणा झाली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर झपाट्यानं वधारलेल्या अमेरिकेतील बाजारालाही तडाखा दिला आहे. ‘एनव्हिडिया’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या दिग्गज कंपनीच्या समभागांत तब्बल 17 टक्क्यांची घसरण ‘डीपसेक’च्या पदार्पणानंतर पाहायला मिळाली. एसअँडपीच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील समभागात 2020 नंतरची सर्वांत मोठी घसरण झाली. अमेरिकाकेंद्री तंत्रज्ञानाच्या कंपन्यांमधील धनदांडग्यांच्या गुंतवणुकीतील बाजारमूल्यामध्ये 24 तासांत 9 लाख कोटींची घट ‘डीपसीक’च्या आगमनाने घडून आली. इतर सूचीबद्ध कंपन्या आणि स्टार्टअप युनिटस्च्या मूल्यांकनातही घट झाली आहे.
साहजिकच इतकी उलथापालथ घडवण्यासारखं ‘डीपसीक’नं काय केलं, असा प्रश्न यानिमित्तानं पडणं स्वाभाविक असलं तरी त्याचं उत्तर शोधण्यासाठी थोडंसं इतिहासात डोकावावं लागेल. जगभरात गेल्या काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढू लागला आहे आणि या क्षेत्रामध्ये खूप मोठं संशोधनही सुरू आहे. त्यातून नवनवीन आविष्कार आकाराला येत आहेत. आपण अगदी दैनंदिन जीवनातही अप्रत्यक्षपणे त्याच्याशी जोडलेलो आहोत. याच शृंखलेमध्ये ‘चॅटजीपीटी’ नावाचे एक टूल ओपनएआय या कंपनीने 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच केले होते. त्यावेळीही आजच्या सारखाच धुमाकूळ उडाला होता. विशेषतः तंत्रज्ञानाच्या विश्वात, त्यातही सर्च इंजिनच्या क्षेत्रात अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे मक्तेदारी निर्माण केलेल्या ‘गुगल’ या कंपनीला चॅटजीपीटीने खूप मोठा धक्का बसला. कारण चॅटजीटीपी हे गुगलला सार्थ पर्याय म्हणून पुढे आले. ओपनएआयमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् यांनी गुंतवणूक केलेली होती. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या परस्परांच्या स्पर्धक कंपन्या. मायक्रोसॉफ्टने गुगलच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी काही सर्च इंजिन्स बाजारात आणून पाहिले. परंतु गुगलचे स्थान अबाधित राहिले होते. तथापि, चॅटजीटीपीनं ‘एक ही मारा लेकिन सॉलिड मारा’ अशी स्थिती निर्माण झाली. कारण वर्षानुवर्षे गुुगलवर जे काम केलं जात होतं, तेच काम, त्याहून अधिक सरसपणानं चॅटजीटीपीद्वारे होऊ लागलं. विशेषतः एआयच्या विश्वातील ‘जनरेटिव्ह एआय’ या प्रणालीच्या माध्यमातून चॅटजीटीपी युजर्सच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम होता. सुरुवातीला त्यात 2022 पर्यंतची माहिती फीड करण्यात आली होती. तसेच त्यासाठी शुल्कही मोजावे लागत होते. परंतु नंतर त्याचे अद्ययावत व्हर्जनही बाजारात आले आणि रिअलटाईम माहिती देण्यापर्यंत त्याची कक्षाही विस्तारली. दरम्यानच्या काळात गुगलने बार्ड आणि जेमिनीसारखे चॅटबोट आणून चॅटजीटीपीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मेटानेही असे प्रयत्न करून पाहिले. अलीकडील काळात तर ‘गुगल’वर कोणताही शब्द टाकून सर्च केल्यास ‘जनरेटिव्ह एआय’च्या माध्यमातून त्याविषयी छोटेखानी माहिती दिली जाताना दिसते. ही चॅटजीपीटीला शह देण्यासाठीची क्लृप्ती. कारण चॅटजीपीटीची लोकप्रियता इतक्या झपाट्याने वाढत आहे की, त्यामुळे गुगलवर केल्या जाणार्या सर्चचे प्रमाण बाधित होत आहे. चॅटजीपीटीचा वापर करून शालेय निबंधांपासून ते शोधनिबंधांपर्यंत आणि कथाचित्रांपासून कादंबर्यांपर्यंत असंख्य गोष्टी तयार केल्या जात आहेत. त्यामुळं इतकी वर्षं गुगल एक्के गुगल हे गणित बदलून गेलंय. माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वातल्या या घडामोडी पाहिल्यास त्यांचा प्रभाव विश्वव्यापी असला तरी यातील सर्व कंपन्या अमेरिकन आहेत. अन्य एकही देश काल-परवापर्यंत या स्पर्धेत नव्हता. परंतु ‘डीपसीक’चं आगमन झालं आणि चीनची या युद्धामध्ये एंट्री झाली. चीनने डीपसीकच्या माध्यमातून केवळ एंट्रीच केली नाही, तर अमेरिकेच्या दबंगशाहीला प्रत्युत्तर दिले. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे डीपसीकनं तयार केलेली मॉडेल्स ही अत्यंत कमी खर्चात बनवण्यात आली आहेत. चॅटजीपीटी, एललामा, ग्रोक क्लाऊड आणि इतर प्रमुख भाषा मॉडेल तयार करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. त्या तुलनेत डीपसीकने बनवलेले चॅटबोट हे केवळ 56 लाख डॉलर म्हणजे जवळपास 50 कोटी रुपये खर्चून तयार केले आहेत. चॅटजीपीटीसाठी याहून दहापट अधिक रक्कम खर्च करण्यात आली होती. विशेष म्हणजे डीपसीकचे हे मॉडेल अतिशय स्वस्त चिपसह डिझाईन केले गेले आहे. त्याची किंमत चॅटजीपीटी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटपेक्षा (जीपीयू) खूपच कमी आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार यासाठी फक्त 2000 जीपीय वापरले आहेत. ही संख्या चॅटजीपीटीसाठी वापरल्या जाणार्या जीपीयूंपेक्षा खूपच कमी आहे. कोणत्याही भाषेच्या मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी उच्च दर्जाचे जीपीयू आवश्यक असतात. मोठ्या भाषा मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. हे जीपीयू म्हणजे खास एआयसाठी डिझाईन केलेले ग्राफिक कार्डस् असतात. मोठ्या भाषेतील मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी भरपूर संगणकीय शक्तीची आवश्यकता असते. यामुळे एआय मॉडेल्ससाठी जीपीयू आणखी महत्त्वाचे बनतात.
डीपसीक कंपनीचा हा प्रोग्राम ओपन सोर्स कोड आहे. म्हणजेच कोणीही त्याची चाचणी किंवा बदल करू शकतो आणि कोणताही प्रोग्रामर त्याच्या मदतीने अॅप्लिकेशन तयार करू शकतो. सध्या तयार असणार्या संगणकांवरही त्याचा वापर केला जाऊ शकतो. मोठ्या हायपर स्केलिंग डेटा सेंटरमध्येदेखील हा प्रोग्राम अगदी सहज चालवता येते. सध्या डीपसीकचे दोन मॉडेल आहेत. आर 1 आणि आर 1 झिरो. यापैकी सध्या आर 1 हे मॉडेल युजर्ससाठी उपलब्ध आहे. डीपसीककडे वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारी एक खास गोष्ट आहे ती म्हणजे हा एआय असिस्टंट सध्या वापरण्यास पूर्णपणे विनामूल्य आहे. कोणीही एक रुपयाही न खर्च करता या चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतो. विनामूल्य असूनही इतर एआय असिस्टंटप्रमाणे यात कसलीही मर्यादा नाहीये. म्हणजेच अनेक प्रश्न विचारल्यानंतरही तुम्हाला चॅटजीपीटीप्रमाणं ’तुमची मोफत मर्यादा संपली आहे’ असा संदेश मिळणार नाही. त्यामुळं चॅटजीपीटी, गुगल, मेटा आणि एआयच्या क्षेत्रातील अन्य विकसनशील कंपन्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सची पुढील पिढी सुधारण्यासाठी डीपसीककडून काही कल्पना नक्कीच स्वीकारू शकतात, असं म्हटलं जात आहे. याचं कारण डीपसीकनं अधिक कार्यक्षम मेमरी व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. यामुळेच कमी शक्तिशाली हार्डवेअरवर काम करूनही प्रशिक्षण घेतल्यानंतर डीपसीकला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकणे शक्य होते.या वैशिष्ट्यांमुळंच रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच डीपसीक बाजारात लोकप्रिय झाला. ओपनएआयच्या चॅटजीपीटीला मागे टाकून ते अमेरिकेमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरवर सर्वाधिक रेट केलेले विनामूल्य अॅप बनले आहे.
चीनने आज जगभरात उद्योगक्षेत्रामध्ये लायन लीप घेतली असली तरी त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे जगाच्या पाठीवरील कोणत्याही उत्पादनाची हुबेहुब नक्कल करुन ते मेड इन चायना असा शिक्का मारुन चीन जगभरात त्याची विक्री करत असतो. त्याची गुणवत्ता भलेही बेतास बात असेल; पण किंमत कमी ठेवून ही चीनी उत्पादनं मूळ उत्पादनाला कडवी झुंज देताना दिसतात. ‘डीपसीक’ नं ही परंपरा कायम ठेवली आहे.
असं असलं तरी ‘डीपसीक’नं घडवून आणलेली उलथापालथ व्यापक द़ृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध कमालीचे तीव्र बनत चालले आहे. अमेरिकेच्या जागतिक अर्थसत्ता या स्थानाला धक्का देऊन 2049 पर्यंत चीनला सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट शी झिनपिंग यांनी ठेवलेलं आहे आणि त्यानुसार चीन योजनाबद्ध रितीनं पावलंही टाकत आहे. दुसरीकडं अमेरिकेला चीनच्या या महत्त्वाकांक्षेला खोडा घालण्यासाठी विविध प्रकारांनी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेनं चीनला एआयच्या विकासासाठी आवश्यक असणार्या मायक्रोचिप्सच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. या माध्यमातून एआयच्या क्षेत्रात अमेरिकेची मक्तेदारी कायम राहावी आणि चीनच्या एआय क्रांतीला खिळ बसावी असा दुहेरी द़ृष्टिकोन होता. परंतु अमेरिकेने चीनला उच्च क्षमतेचे जीपीयू निर्यात करणे थांबवल्यानंतर डीपसीकने हा शोध लावला आहे. लियांग वेनफेंग हाय-फ्लायर नावाच्या हेज फंडचे संस्थापक होते. याच फंडाने डीपसीकला आर्थिक पाठबळ पुरवले आहे. या कंपनीने 2022 साली एनव्हिडिया या कंपनीकडून उच्च कार्यक्षमता असणार्या जवळपास 10 हजार ए 100 ग्राफिक प्रोसेसर चिप खरेदी केल्या होत्या. याच चिपच्या मदतीने डीपसीकने आपले पहिले एआय मॉडेल बाजारात आणलं आहे.
हे लक्षात घेता डीपसीकचं हे यश अमेरिकेच्या आत्मकेंद्रीवादाला शह देणारे आहे. तसेच प्रगत संगणकीय संसाधने सामायिक करण्यास नकार देण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. संसाधनांच्या तुटवड्यामध्ये कमी खर्चात मार्ग शोधण्याचे अद्वितीय उदाहरण म्हणून डीपसीकच्या उदयाकडं पाहिलं जात आहे. ओपन सोर्सचा अवलंब करून आणि एआय सहज उपलब्ध करून देऊन डीपसीक कंपनीने अल्गोरिदमच्या प्रसाराचा मार्गही मोकळा केला आहे. जगभरातील विकासक हे मॉडेल वापरतील अशा अॅप्लिकेशन्सचा शोध घेऊ लागले आहेत. यामुळे अमेरिकेला आता इतरांना संसाधने न देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल. चीनसाठी हे घवघवीत यश असेल तर अमेरिकेसाठी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा धडा ! येणार्या काळात ओपन सोर्स कोडद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून दिल्याने, सिलिकॉन व्हॅलीमधून अधिक शक्तिशाली जनरेटिव्ह एआय मॉडेल्स येतील, परंतु त्यांना इतरत्र तयार केल्या जाणार्या मॉडेल्सपासून कठोर स्पर्धेला सामोरे जावे लागेल.
भारत स्वतःच्या मोठ्या भाषेच्या मॉडेलवर म्हणजेच एलएलएमवर काम करत आहे आणि ते 10 महिन्यांत तयार होईल, असे सांगण्यात येत आहे. भारतात मजबूत संगणकीय सुविधा आहेत. या आपल्या एआय मिशनला चांगला पाठिंबा देतील. सरकारने 18,000 जीपीयूज असलेली संगणकीय सुविधा तयार केली आहे. ते लवकरच स्टार्टअप्स, संशोधक आणि विकासकांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले जात आहे. भारत सरकारचे जनरेटिव्ह एआय मॉडेल आले तर त्याची थेट स्पर्धा चीनी कंपनी डीपसीकच्या एआय मॉडेल आणि ओपनएआयद्वारे तयार करण्यात आलेल्या चॅटजीपीटीशी होऊ शकते. पण या स्वदेशी मॉडेलमुळे परदेशी एआय मॉडेलवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल आणि भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होईल. एकंदरीत, डीपसीकमुळं एआयच्या क्षेत्रात आधीपासूनच सुरू असलेली स्पर्धा नव्या वळणावर पोहोचली आहे; पण याच्या तळाशी असणारा प्रश्न कायम आहे. तो म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता वापर बेरोजगारी वाढवण्यासह मानवी बौद्धिक क्षमतेवर परिणाम करणारा ठरणार का? याचं उत्तर दुर्दैवानं होकारार्थी आहे. भारतानं स्वतःचं एआय टूल विकसित करताना या गाभ्याशी असणार्या प्रश्नाबाबत अधिक खोलात जाऊन विचार करणं गरजेचं आहे.
भारत स्वतःचे जनरेटिव्ह ए.आय. मॉडेल आणणार
चीनच्या या यशाचे गोडवे ऐकताना प्रतिभावंतांची खाण असणार्या भारताला अमेरिकेच्या मक्तेदारीला शह देण्यात आघाडी का घेता आली नाही, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. वस्तुतः भारतीय अभियंते अशा गोष्टींसाठी अधिक तयार आहेत. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज आहे. भारतात एआय संबंधित योजनांना चालना दिल्यास देशातील तंत्रज्ञानाचा वेग वाढेल. देशातील डेटा सेंटर्सची वाढही झपाट्याने झाली आहे आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने येथील बाजारपेठ एआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत या नवीन प्रयोगांसाठी भारत हे योग्य ठिकाण बनू शकते. अलीकडेच भारताचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या या स्पर्धेला तिसरा कोन देण्याचं काम भारत करणार आहे. भारत देखील स्वतःचे जनरेटिव्ह एआय मॉडेल आणणार आहे.