डोप टेस्टसाठी नकार दिल्याने टोकियो ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीद्वारे नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल पुनियावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनामुळे आता बजरंग पुनियाला स्पर्धात्मक कुस्तीमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, बजरंग पुनिया याने ऑक्टोबर महिन्यात किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान 10 मार्च रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुना सादर करण्यास नकार दिल्याने बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केले होते. NADA ने सुरुवातीला 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला त्याच गुन्ह्यासाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर त्याला जागतिक प्रशासकीय मंडळ, UWW ने निलंबित केले होते.
सुरुवातीला बजरंगने निलंबनाचा निषेध केल्याने 31 मे रोजी, NADA च्या डोपिंग विरोधी पॅनेलने (ADDP) आरोपांची औपचारिक नोटीस जारी होईपर्यंत तात्पुरते निलंबन मागे घेतले होते. मात्र, पुन्हा 23 जून रोजी नाडाने त्याला आरोपांची औपचारिक माहिती दिली. परंतु पुनियाने आरोपांविरुद्ध 11 जुलै रोजी आव्हान दाखल केले, त्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.