Published on
:
04 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:50 am
सांगली ः विटा येथील कार्वे एमआयडीसीत एमडी ड्रग्जचा कारखाना उभारण्यासाठी दिल्लीतून मशिनरी मागविण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणार्यासह ड्रग्ज तयार करण्यास मदत करणार्या तिघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या. यात मुंबईचे दोन, तर सांगली जिल्ह्यातील वाळव्याच्या एका संशयिताचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली असून, कार्वे ड्रग्जप्रकरणी आता मुंबई, गुजरातसह दिल्ली कनेक्शनही समोर आल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
संशयित जितेंद्र शरद परमार (वय 41, रा. नागडोंगरी, ता. अलिबाग, सध्या रा. ताहिर बेकरीच्यावर, माहिम 16, मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (53, रा. उस्मानिया मशिदीजवळ, पाठणवाडी, फिल्डरवाडा, पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (34, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यापूर्वी रहुदीप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत), सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (24, रा. विटा) या तिघांना दि. 27 जानेवारीरोजी अटक करण्यात आली होती.
विट्याजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पथकाने छापा टाकून 29 कोटी रुपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी जप्त केले. याप्रकरणी बोरिचा, सुलेमान शेखर व कातारी या तिघांना अटक केली. तिघांची कसून चौकशी केली असता, आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. या सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती.
तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर संशयितांनी एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी रहुदीप बोरिचा याने दिल्लीहून मशिनरी मागविली. त्याचे पैसे सुलेमान शेख याने कंपनीला पाठविले. मशिनरी खरेदीसाठी जितेंद्र परमार याने पैसे दिले होते. ड्रग्जसाठी आवश्यक केमिकल वापी, गुजरातमधून मागविण्यात आले. सरदार पाटील याला ड्रग्जविषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले, तर बलराज हा अब्दुलरज्जाक शेख याला पुणे, मुंबईत जाऊन माल देत होता. जितेंद्र, अब्दुलरज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अधीक्षक घुगे म्हणाले, एमडी ड्रग्जप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे. या प्रकरणात ड्रग्जची वाहतूक, पुरवठादार, कार्वे एमआयडीसीपर्यंत मशिनरी, केमिकल्स कसे पोहोचले, विक्रीसाठी कोणी मदत केली याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात दिल्ली, गुजरात, मुंबईचे कनेक्शन उघड झाले आहे. मशिनरी व केमिकल्स तपासाबाबत एलसीबीची पाच पथके तयार करून ती मुंबई, दिल्ली व गुजरात येथे रवाना करण्यात आल्याचे सांगितले.
ड्रग्जप्रकरणी अटक केलेले सहा संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये ओळख झाली होती. रहुदीप बोरिचा याच्यावर अग्रीपाडा, विलेपार्ले, एमआयडीसी मुंबई शहर पोलिसांत चोरी, फसवणुकीचे गुन्हे आहेत. बलराज कातारी याच्यावर विटा, माटुंगा (मुंबई) येथे घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख आणि सरदार पाटील यांच्यावर 2019 मध्ये एमडी ड्रग्जचे उत्पादन केल्याबद्दल मुंबईत काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कारवाईवेळी 200 किलो एमडी ड्रग्ज पकडले होते. चौघेजण पाच वर्षे कारागृहात होते. तेथे रहुदीप बोरिचा, बलराज कातारी यांची ओळख झाली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
बोरिचा, पाटीलला ड्रग्जची माहिती
रहुदीप बोरिचा व सरदार पाटील हे दोघे रसायनशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना केमिकल्सबद्दल माहिती होती. कार्वे येथे तिघांनी ड्रग्जचा कारखाना उभारल्यानंतर सरदार पाटील याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले होते. ड्रग्ज उत्पादनाचा प्रयत्न दोनवेळा फसला होता. तिसर्यावेळी ड्रग्ज बनविण्यात यश आले. पण ते कारखान्यातून बाहेर पडण्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकून जप्त केले.
संशयितांकडून रोखीत व्यवहार
संशयितांनी कारखाना उभारताना पैशाची देवाण-घेवाण रोख रकमेच्या स्वरूपात केली. तसेच विटा परिसरात मोबाईल नंबर, लोकेशन येऊ नये, याची खबरदारी घेतली होती. त्याचा पेडलर्सशी संपर्क होता का? ड्रग्जची विक्री कोणाला करणार होते? हे तपासात उघड होईल. यात आणखी काही संशयित रडारवर असल्याचे घुगे यांनी सांगितले.