Published on
:
15 Nov 2024, 11:42 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:42 pm
नमस्कार साहेब, निवडणुकीच्या गडबडीत आहात, तरीही थोडासा वेळ पाहिजे होता मुलाखतीसाठी. प्लीज.
अहो, घाई गडबड कसली? आपल्या मागे अजिबात घाई नाही. हे काय, आता तुमच्यासमोर निवांत मिसळ खात बसलो आहे की नाही? घ्या मुलाखत. विचारा काय प्रश्न विचारायचे आहेत ते.
नाही म्हणजे साहेब, तुम्ही सलग तिसर्या वेळी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहात. यापूर्वीच्या दोन्ही वेळा तुम्ही फार मोठ्या मतांनी पराभूत झाला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये तुमचे डिपॉझिट पण जप्त झाले होते, असे पेपरात छापून आले आहे, तरी पण तुम्ही पुन्हा उभे आहात. या मागे नेमकी काय प्रेरणा आहे?
हे बघा, डिपॉझिट म्हणजे रक्कम असतेच किती? ते जप्त होणारच असते. तुम्हाला कोणी सांगितले की, मी निवडून येण्यासाठी उभा आहे. मी निवडून येण्याची शक्यता एक टक्का पण नाही; पण काही एक हौस असते की नाही माणसाला? आमचे वडील त्यांच्या उमेदीच्या काळात राजकारणात होते, तेव्हा त्यांनी एकूण सात निवडणुका लढवल्या होत्या. या सातपैकी पाच आमदारकीच्या आणि दोन खासदारकीच्या होत्या. या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते; पण ते हिंमत हरले नाहीत. लढत राहिले, लढवत राहिले. जाताना, अहो, म्हणजे स्वर्गवासी होताना, वडिलांनी मला काही मागितले नाही. ते म्हणाले, किमान एकदा तरी आमदार होऊन दाखव आणि तू झाला नाहीस तर किमान तुझ्या मुलाला तरी आमदार कर, तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल. मी वडिलांना वचन दिले आहे की, तुमची इच्छा पूर्ण करीन आणि एक ना एक दिवस आमदार होऊन दाखवीन. एक मुलगा म्हणून माझे ते कर्तव्यच नाही का? मी त्या कर्तव्याला जागून दर इलेक्शनला फॉर्म भरत असतो आणि पडत असतो. मला खात्री आहे, एक ना एक दिवस जनतेला माझी कीव येईल आणि ते मला प्रचंड मतांनी निवडून देतील.
अहो, काय कमाल करता? प्रचार आमचे कार्यकर्ते करत आहेत. प्रत्येक इलेक्शनला मी साधारणतः 25 लाख रुपये बजेट बाजूला ठेवत असतो. मागच्या इलेक्शनला सोयाबीन विकले त्याचे दहा लाख आले होते, उसाचे पंधरा लाख आले होते. यंदा पीकपाण्यात फार काही सुटले नाही म्हणून चार एकरांचा तुकडा विकला आहे आणि इलेक्शनला उभा आहे. अर्ज मागे घ्या म्हणून माझ्याकडे बरेच मोठे उमेदवार आले होते. त्यांनी मला पाच पंचवीस लाख रुपये देण्याचे आमिष पण दाखवले होते.
समजा, तुम्ही निवडून आलात तर जनतेला काय आश्वासन देत आहात?
आता हे बघा महोदय, आपण अपक्ष म्हणून निवडून येणार. आपण काय जनतेला देणार? सरकारी योजना ज्या काय आहेत, त्या जनतेला मिळत राहतीलच. शिवाय आपण अपक्ष असल्यामुळे कुठल्या तरी मोठ्या पक्षाबरोबर जुळवून घेऊन राहणार आहोत. तो पक्ष जे काही देईल ते जनतेला आपोआपच मिळणार आहे. मी वेगळे असे काय देणार आहे? आपला मतदारसंघ काय देशाबाहेर आहे की काय? त्याचा आपोआप विकास होणारच आहे.