माजी आ. परशुराम उपरकरpudhari photo
Published on
:
06 Feb 2025, 12:25 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:25 am
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्ह्याची नियोजन बैठक राणे पिता-पूत्रांनी चालवत अधिकार्यांना फैलावर घेतले ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. मात्र खर्या अर्थाने हे करत असताना पालकमंत्री नितेश राणे आणि राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली रिक्त पदे भरावीत, जिल्ह्यातील ठेकेदारांचे विविध विकासकामांपोटी सव्वा दोनशे कोटी रुपये थकीत आहेत ते मार्च पूर्वी मिळवून द्यावेत. जाहीर केल्या प्रमाणे 400 कोटी रुपये जिल्हा नियोजनला आणून दाखवावेत, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, या गोष्टी केल्यास शिवसेनेतर्फे पालकमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू, असे माजी आ. परशुराम उपरकर यांनी सांगितले.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, पालकमंत्र्यांनी सर्व रुग्णालयात डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा आरोग्यावरती जो खर्च होतो तो थांबेल, रूग्णांना गोव्याला पाठवू नका असे त्यांनी म्हटले आहे, त्यासाठी तज्ञ डॉक्टर , सर्जन किंवा अन्य डॉक्टर हे सुद्धा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्याचबरोबर आज सर्व महाराष्ट्रातल्या ठेकेदारांनी 89 हजार कोटीची बिले थकीत असल्यामुळे आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक या सर्व विभागांची बिले अडकली आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे कोटीची बिले या सर्व लाडक्या भावांची अडकलेली असल्याचा उपरोधीक टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.
ते म्हणाले एका बाजूला लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत आणि काढूनही घेत आहेत. लाडक्या भावांचे पैसे त्यांना मिळवून द्या. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये अनैतिक धंदे चालू आहेत, मटका-जुगार अवैध दारु धंद्यांना आळा घालण्याची घोषणा पालकंत्र्यांनी केली आहे. येत्या 6 महिन्यात या गोष्टी झाल्या तर शिवसेना पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार करेल. जे वडिलांना व इतर पालकमंत्र्यांना जमले नाही ते 400 कोटीचा जिल्हा नियोजनचा आराखडा नेण्याची पालकमंत्र्यांनी हिम्मत दाखवली. त्याबद्दल अभिनंदन आहे, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.