Published on
:
22 Jan 2025, 12:16 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:16 am
आयर्लंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकत असताना भारताच्या रणरागिणींनी जो आवेशपूर्ण खेळ साकारला, त्याला तोड नाही. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर उत्तम वरचष्मा गाजवताना भारतीय महिला क्रिकेटपटूंनी एकीकडे संघ एकजिनसी असल्याचा उत्तम दाखला तर दिलाच शिवाय जागतिक क्रिकेटवरील आपली मजबूत पकड आणखी अधोरेखित केली. आपल्याला जागतिक क्रिकेटमध्ये तेजतर्रार रणरागिणी असे का संबोधले जाते, याचेच अलगद उमटलेले हे अवीट प्रतिबिंब!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच 400 पारचा भीम पराक्रम, अवघ्या 70 चेंडूंतील स्मृती मानधनाचे तडफदार शतक, प्रतीका रावलची महिला वन डेमध्ये एकाच डावात 150 हून अधिक धावांची आतषबाजी, महिला वन डे क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावांची विक्रमी सलामी, एकाच डावात 48 चौकार, 9 षटकारांची आतषबाजी आणि इतके कमी की काय म्हणून वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च 304 धावांनी मिळवलेला एकतर्फी विजय! एखाद्या स्क्रीप्टमध्येही येणार नाही, इतक्या विक्रमांची ही बरसात इतके सांगण्यासाठी पुरेशा आहेत की, भारतीय महिला संघाची वाटचाल अतिशय योग्य ट्रॅकवर होत आहे!
सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्याला गौरवणे, याचे प्रशिक्षण कुठेही मिळत नाही. पण, तो गुणही भारतीय रणरागिणींनी या मालिकेत दाखवला. विजयश्रीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर भारतीय रणरागिणींच्या चेहर्यावर अवश्य त्याचा आनंद झळकला; पण त्या विजयश्रीच्या आनंदालादेखील नम्रतेची झालर होती, प्रतिस्पर्ध्याबद्दलचा आदर होता, खेळातील चढउताराची प्रगल्भ जाणीव होती. भारतीय महिला संघ आता वन डे क्रिकेटमधील आपली पुढील मालिका जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळेल. त्या मालिकेला बराच अवकाश आहे; पण त्या मालिकेत उतरतानाही त्यांचे खरे लक्ष्य आयसीसी विश्वचषक जिंकण्यासाठी पूर्वतयारी करणे हेच असेल, हे ओघानेच आले.
या विजयातील एक मुख्य शिल्पकार असणारी, चौफेर फटकेबाजी करत सहज शतकापार पोहोचणारी प्रतीका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगदीच नवखी; पण तिने प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचे जे बुलंद इरादे प्रत्यक्षात साकारण्याची धमक दाखवली, ती नि:संदेह स्पृहणीय! प्रतीकाच्या उमद्या प्रारंभाची झलक यावरूनच यावी की, तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर पहिल्या 6 डावांतच थोड्याथोडक्या नव्हे, तर 444 धावांची आतषबाजी केली आणि तीही 74 च्या तडाखेबंद सरासरीने! (दक्षिण आफ्रिकेच्या मलानचा अपवाद वगळला, तर आंतरराष्ट्रीय पुरुष व महिला क्रिकेटमध्ये आणखी कोणालाही असा भीम पराक्रम गाजवता आलेला नाही). अवघ्या 129 चेंडूंत 154 धावा कुटणार्या प्रतीकाने सहकारी सलामीवीर स्मृती मानधनासह 233 धावांची सलामी दिली, तोही आणखी एक उत्तुंग विक्रमच!
आश्चर्य म्हणजे, आयर्लंडविरुद्ध प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्यासाठी प्रयत्नशील असणारी स्मृती मानधना येथे नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या गैरहजेरीत संघाच्या नेतृत्वाची धुराही कसोशीने सांभाळत होती. प्रतीकाची फलंदाजी अगदी जवळून पाहणार्या स्मृतीने तिसर्या सामन्यानंतर तिच्यावर स्तुतिसुमने उधळली नसती, तरच नवल होते! स्मृती ओघातच बोलून गेली, ‘संयम आणि आक्रमणाचा इतका सुंदर मिलाफ मी आजवर कुठेच पाहिलेला नाही! प्रतीका एखादा चेंडू बॅटीच्या तडाख्याने थेट स्टेडियमवर भिरकावून देईल आणि त्यानंतर लगेच पुढील चेंडूवर आवश्यकता असेल, तर अगदी बचावात्मक फटकादेखील तितकाच तोडीस तोड खेळेल!’
ज्याप्रमाणे स्मृती मानधना, प्रतीका रावल यांनी तडफ दाखवली, तोच कित्ता अन्य संघ सहकार्यांनीही गिरवला आणि त्याचमुळे ही विजयी घोडदौड विशेष लक्षवेधी ठरली. दीप्ती शर्मा, तनुजा कनवर, मिन्नू यांची भेदक फिरकी खेळणे भल्याभल्यांना शक्य होत नाही, ही संघाची मजबुतीच. याशिवाय, जेमिमा रॉड्रिग्यूज, हरलीन, सायमा, सायली, रिचा घोष या बिनीच्या शिलेदारांचा वाटाही तितकाच महत्त्वपूर्ण, तितकाच लक्षवेधी! तेजतर्रार रणरागिणींचा हा पराक्रम त्यामुळेच विशेष महत्त्वाचा!