शिवसेनेतर्फे दक्षिण मध्य मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे या महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले. 16 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईतील कला व क्रीडाप्रेमींना अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.
शिवसेना नेते आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असलेला हा महोत्सव क्रीडा व सांस्कृतिकप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. क्रिकेट (पुरुष), क्रिकेट (महिला), फुटबॉल, खो-खो, कुस्ती, टेबल टेनिस, कॅरम, रस्सीखेच, पंजा, बुद्धिबळ, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगासने, दहीहंडी तसेच चित्रकला स्पर्धा आणि बरेच काही यामध्ये सामील आहे. स्पर्धेत विजेत्यांसाठी एकूण 11 लाख लाख रुपयांच्या रोख बक्षिसांची घोषणा केली आहे. महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, समर्थ व्यायाम मंदिरचे उदय देशपांडे, मुंबई रणजी सलामीवीर आयुष म्हात्रे आदी उपस्थित होते.
जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकणार नाही
मल्लखांब, अॅक्रोबेटिक्स, जिम्नॅस्टिक्स यासारखे जगप्रसिद्ध खेळ आपल्या मातीतून येतात याचा आपल्याला अभिमान असायला हवा. महोत्सवात सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना मी एवढेच सांगेन की, आज तुम्ही राज्यस्तरीय खेळाडू आहात. लवकरच तुम्ही देशासाठी खेळणार आहात. मेडल्स मिळवून आपल्या देशाचे नाव आणखी मोठे कराल. या महोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मैदानात खेळण्याची संधी मिळालीय. अनेक जगप्रसिद्ध खेळाडू याच मातीतून जन्माला आले आहेत. या मैदानातून आशीर्वाद घेऊन तुम्ही पुढे निघालात तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकणार नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.