दापोली : येथे आ.योगेश कदम यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी. (छाया : अनुज जोशी)
Published on
:
24 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:45 am
दापोली : 2014 साली दापोली मतदारसंघात संजय कदम यांनी बाजी मारली होती. मात्र, 2019 मध्ये योगेश कदम यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत विजयी झाले. त्या नंतर राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना या वादात पुन्हा एकदा 2024 च्या निवडणुकीत देखील दापोलीत योगेश कदम यांनी निवडणूक जिंकली आहे.
यावेळीही दापोली मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ अशी स्थिती होती. मतदानानंतर दोन दिवस दापोलीत शांतता होती. मतदान ‘फिफ्टी फिफ्टी’ होईल, असा कल सर्वत्र दिसत होता. त्यामुळे कोण जिंकून येईल, याबाबत कोणीच काही बोलत नव्हते. मात्र, मतमोजणीच्या आदल्या दिवशी दापोलीत शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपला उमेदवार विजयी होईल, अशा हालचाली चालू झाल्या आणि विजयरथ सजला. त्यामुळे दापोलीत राजकीय वातावरण एकदम बदलले.
दापोलीतील लढाई प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही बाजूने कार्यकर्ते तयारीत होते. आपण केलेल्या सामाजिक कामांच्या जोरावर विजयी होऊ, असा विश्वास संजय कदम यांना होता तर जनता विकासकामांना साथ देईल, असे योगेश कदम म्हणत होते. त्यामुळे या लढतीकडे सार्यांचे लक्ष होते.
शनिवारी निकालाच्या दिवशी टपाली मतदानातून योगेश कदम यांनी आघाडी घेतल्यानंतर मंडणगड, दापोली, खेड या दोन्ही तालुक्यांमध्ये योगेश कदम आघाडीवर राहिले. या निवडणुकीत संजय कदम यांना 80914 इतकी मते पडली तर योगेश कदम यांना 105007 मते मिळाली. या वेळी योगेश कदम 24093 मतांनी विजयी झाले.