Published on
:
06 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:45 am
चिपळूण : खेर्डी येथील एका शिक्षकाने एका महिलेला तब्बल 21 लाखांना गंडा घातला आहे. एका ठिकाणी गुंतवणूक केल्यास दर दिवशी चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून फसविल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद केंद्रशाळा खेर्डीजवळ राहणार्या सचिन चांगदेव येळवी (36) याच्यावर अलोरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 जुलै 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत शिरगाव वरचीवाडी येथे घडली. आपण फसल्याचे लक्षात येताच त्या महिलेने शिरगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानुसार सचिन चांगदेव येळवी याने गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर दिवशी चांगला परतावा मिळवून देतो, असे आमिष या महिलेला दाखविले. या आमिषाला बळी पडून त्या महिलेने वेळोवेळी गुगल पे, धनादेश तब्बल 22 लाख 66 हजार 234 रक्कम दिली.
सुरुवातीला आरोपी सचिन येळवी याने त्या महिलेला काही दिवस दर दिवशी चांगला परतावा दिला. त्यामध्ये 1 लाख 84 हजार 225 रूपये इतकी रक्कम परतावा म्हणून दिली. मात्र, त्यानंतर आजपर्यंत 20 लाख 82 हजार 9 रूपये ही रक्कम परत दिलेली नाही. या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणीदेखील केली. परंतु प्रत्येकवेळी काही ना काही कारण सांगून या महिलेला उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसांत धाव घेतली. शिरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.