पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा अर्ज राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांच्याकडे सादर करताना दामोदर नाईक. बाजूस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री बाबू कवळेकर, मंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजित राणे व पदाधिकारी. Pudhari File Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:36 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:36 am
पणजी : भाजप गोवा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार दामोदर ऊर्फ दामू नाईक यांची निवड झाली आहे. शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या दिवशी दामू नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे ते गोवा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील हे निश्चित झाले. शनिवारी (दि.18) सकाळी 10 वा. गोमंतक मराठा समाज सभागृह, पणजी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दामू नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा आणि त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल हे गोव्यात दाखल झाल्यानंतर प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर दामू नाईक यांनी बन्सल यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, माजी मंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत व कोअर समितीचे सदस्य, भाजप नेते उपस्थित होते.
भाजपने यापूर्वी बूथ समिती, मंडळ समिती आणि जिल्हा समिती अध्यक्षांची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी दामू नाईक यांच्यासह माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र शेवटी गोव्यात बहुसंख्येने असलेल्या भंडारी समाजाच्या नेत्याला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यानंतर भंडारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष झालेले दामू नाईक हे दुसरे भाजपा नेते आहेत. दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्रकारांनी दामू नाईक यांना येत्या निवडणुकीबाबत विचारले असता. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फातोर्डाचे माजी आमदार असलेले दामू नाईक यांनी 2002 व 2007 विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र त्यानंतर 2012, 2017 आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार विजय सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार मावळते प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे राज्यसभा खासदार झाल्यामुळे आणि त्यांची पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण झाल्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रीय भाजप अध्यक्ष निवडणुकीसाठी गोव्यातून पक्षातील 3 नेत्यांना मतदानाचा अधिकार असतो. शुक्रवारी बन्सल यांनी माजी मंत्री दिलीप परुळेकर, जि.पं. सदस्य सुवर्णा तेंडुलकर व द.गो. भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव गावकर यांना सदस्यपद बहाल केले.
‘लक्ष्य’ विधानसभा निवडणूक...
सदानंद शेट तानावडे यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भाजपला जि. पं., पालिका, विधानसभा आणि पंचायत निवडणुकांमध्ये भरभरून यश प्राप्त करून दिले. आता दामू नाईक यांच्यावर 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देतानाच भाजपचे बळ आणखी वाढवण्याची जबाबदारी आहे. गोव्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांच्या तोडीचा नेता असतो. त्यामुळे नाईक यांना त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा पक्षाला करून द्यावा लागणार असून, पक्षाची वाटचाल अजून यशदायी बनविण्याचे आव्हान आहे.