Published on
:
18 Nov 2024, 1:05 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:05 am
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानल्या जाणार्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होत असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या व भाजप बंडखोर उमेदवारांमुळे येथे चौरंगी लढत लक्षवेधी बनली आहे. तरीही अन्य तीन उमेदवारांजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. मात्र या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार व शिंदे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण विजयाचा चौकार ठोकण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
दीपक केसरकरांविरोधात त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी व पारंपरिक विरोधक राजन तेली हे यावेळी उबाठा शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. यावेळी राजन तेली सलग तिसर्यांदा केसरकरांविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. मात्र मविआचा घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी बंडखोरी केल्यामुळे तेली यांची डोकेदुखी वाढली आहे. तर भाजपच्या विशाल परब यांची बंडखोरी केसरकर यांना डोकेदुखी ठरताना दिसत आहे.(Maharashtra assembly poll)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे. या मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे इतिहासकालीन शहर शांत व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. गोवा व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा या मतदारसंघाला लागून आहे.
या मतदारसंघाचे गेले नेतृत्व गेली पंधरा वर्षे दीपक केसरकर करत आहेत. केसरकर यांनी सर्वप्रथम या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून विजयी होत विधानसभेत प्रवेश केला. त्यांनतर दोन वेळा ते शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाची साथ धरली. यामुळे आता चौथ्यावेळी ते या मतदारसंघातून महायुतीचे अर्थात शिंदे शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.
दुसरीकडे केसरकर त्यांचे पारंपरिक विरोधक राजन तेली यांनी दोनवेळा अपक्ष तर यावेळी उबाठा शिवसेनेकडून उभे ठाकले आहेत. मात्र या महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या लढाईत दोघा अपक्ष उमेदवारांनी मात्र ट्विस्ट आणला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी झाल्याने दोन्ही पक्षांना आपले मतदार अपक्ष उमेदवाराकडे जाऊ नये म्हणून मोठी कसरत करावी लागत आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपने केसरकरांच्या विजयासाठी जोरदार कंबर कसली आहे. मात्र विशाल परब व राजन तेली हे दोघेही मूळ भाजपचे पदाधिकारी राहिले आहेत. यामुळे हे दोघे भाजपमधील काही मते आपल्याकडे वळवणार काय? याची उत्सुकता आहे. तर राजन तेलींसाठी ठाकरे शिवसेने बरोबरच काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.(Maharashtra assembly poll)
भाजपा नेते व पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खा. नारायण राणे यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन फुटीर उमेदवारांना मतदान न करण्याचे आावहन केले आहे. अपक्षांना मतदान केल्यास याद राखा,असा सज्जड दम चव्हाण व राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना भरला आहे. आता कार्यकर्ते हा दम किती गंभीरतेने घेतात, याचीही उत्सुकता आहे.
केसरकर- तेलींचे एकमेकावर शरसंधान
मंत्री दीपक केसरकर यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यावर त्यांना झालेला तुरूंगवास, सावंतवाडी बाहेरील उमेदवार आदी विषयांवर केसरकर यांच्याकडून सातत्याने टीका होत आहे. तर गेल्या पंधरा वर्षात एकही विकासकाम करू न शकलेलेे निष्क्रिय आमदार, अशी टीका राजन तेली केसरकरांवर करत आहेत.(Maharashtra assembly poll)
सावंतवाडी मतदारसंघातील प्रमुख समस्या ही रोजगाराची असून अनेक युवक -युवती या रोजगारासाठी गोव्याला जातात. येथे मोठा उद्योग व्यवसाय नाही. मतदारसंघातील दुसरी समस्या ही आरोग्याची असून प्रत्येक रूग्णाला गोवा-बांबोळी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला जावे लागते.