Published on
:
24 Nov 2024, 12:50 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:50 am
राजापूर : अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या लढतीत सेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी मागील तीन टर्म आमदार असलेल्या राजन साळवी यांचा सुमारे 19 हजार 680 मताधिक्याने दणदणीत पराभव करत विधानसभेत दमदार ‘एन्ट्री’ केली आहे. पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेले किरण सामंत अखेरच्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिले. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात मशालीला धक्का देत धनुष्यबाणाने अचूक निशाणा साधला आहे.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किरण सामंत 19 हजार 680 मतांनी दणदणीत विजयी झाले. या निवडणूक महाविकास आघाडीला आव्हान देत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे काँग्रेसचे बंडखोर जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा बार फुसका ठरला, तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या अन्य उमेदवारांना सुद्धा मोठे अपयश पदरात पडले. काही अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाली. राजापूर विधानसभा मतदारसंघात ‘किरणपर्व’ सुरू झाले आहे.
दि. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी शनिवारी राजापूर तालुक्यातील हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात पार पडली. प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये राजन साळवी यांना 748तर किरण सामंत यांना 697 मते मिळाली. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतमोजणीला सुरुवात झाली. अंतिम निकालाअंती महायुतीचे किरण सामंत यांना 80 हजार 256 मते, महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना 60 हजार 579 मते, अपक्ष उमेदवार अविनाश लाड 7 हजार 945मते, संदीप जाधव 1हजार 65 मते, अमृत तांबडे 1 हजार 209 मते, यशवंत हर्याण 286मते, राजेंद्र साळवी 1 हजार 74 मते, संजय यादवराव 372 मते तर 1 हजार 830 मतदारांनी नोटाला पसंती दिली.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत किरण सामंत यांनी 831 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पुढील पत्येक फेरीमध्ये सामंत यांचे मताधिक्य वाढत राहिले. सामंत यांचे मताधिक्य वाढत राहिल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. सलग सतराव्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीत सामंत यांनी आघाडी घेतली . मात्र सतराव्या फेरीत साळवी यांना अवघ्या 69मतांची आघाडी मिळाली. तर 21 व्या फेरीत साळवी यांना 683 मतांची नाममात्र आघाडी घेता आली. हा अपवाद वगळता सामंत यांनी प्रत्येक फेरीत आपली आघाडी कायम राखली आणि दणदणीत विजय संपादन केला.
किरण सामंत मतमोजणी कक्षातून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत एकच जल्लोष केला. त्यानंतर हातिवले येथून सजविलेल्या गाडीतून राजापूर शहरापर्यंत जल्लोषात मिरवणूकही काढण्यात आली.
हा विजय मतदारांचा असून, या विधानसभा मतदारसंघातील रखडलेला विकास कामे मार्गी लावणे यालाच मी प्राधान्य देत आहे. मतदारसंघाचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील. मिळालेला विजय समस्त मतदारांचा आहे.
किरण ऊर्फ भैया सामंत, राजापूर