मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसलेPudhari File Photo
Published on
:
21 Jan 2025, 11:58 pm
Updated on
:
21 Jan 2025, 11:58 pm
सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे जिल्ह्यातील जनतेच्या मनातील खरे राजे आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यातील दोन नंबरचे मताधिक्य घेवून ते लोकशाहीतील राजे देखील ठरले आहेत. त्यामुळे त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्याच्या राजधानीचा सन्मान राखावा, अशी मागणी जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, ना. शिवेंद्रराजेंना सातारचे पालकमंत्रीपद न दिल्यास दि. 26 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कांचन साळुंखे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात प्रथमच लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. असे असूनही सातारा जिल्ह्याला भाजपचे पालकमंत्री पद मिळाले नसल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त भाजपचे आमदार जनतेने निवडून दिले आहेत, तरी सुध्दा भाजपाचा पालकमंत्री सातारा जिल्ह्यासाठी मिळाला नाही, याची खंत सर्वसामान्यांच्या मनात आहे. सरकारने पालकमंत्री पदासाठी कोणते निकष लावले आहेत, हे स्पष्ट करावे.
छत्रपती, शाहू, फुले, क्रांतीवीरांचा व यशवंत विचारांचा सातारा जिल्हा आहे. पालकमंत्रीपद हे जिल्ह्यासाठी दर्जात्मक पद आहे. सातारा जिल्ह्याचा चौफेर विकास होण्यासाठी यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी पदाचा सदुपयोग केला. केवळ तालुक्यावर, जिल्ह्यावर दबाव ठेवलेला नाही. उदयनराजेंनीही शिवेंद्रराजेंच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले हे सुसंस्कृत, संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना सातार्याचे पालकमंत्री करावे, असेही साळुंखे म्हणाल्या.
सरकारने पालकमंत्री पदाचा निर्णय बदलवा. अन्यथा जिल्हयात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमळ हाती घेण्यास सातारा जिल्ह्यातील जनतेचा व आमचा नकार आहे. ही भूमिका ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मांडणार आहोत, असेही साळुंखे यांनी यावेळी सांगितले.