Published on
:
22 Jan 2025, 12:33 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:33 am
मुंबई : खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या महिलांकडून या योजनेंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल, असे राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेवरील शासनाची भूमिका स्पष्ट केली. खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार काय, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा केले जातील. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी व विविध योजनांसाठी वापरले जातील.
राज्यातील साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, अजूनही अनेक महिला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहेत. यावर आदिती तटकरे म्हणाल्या, सरकारची स्वतःची स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे. त्यांतर्गत आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत. ज्या महिलांनी निकषांत बसत नसतानाही या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्या अर्जांची पडताळणी स्वतंत्र व्यवस्थेद्वारे केली जाईल.
विशेषतः, ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहत आहेत. तसेच, गेल्या पाच महिन्यांत ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे, त्यांची यादीही या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल. त्यामुळे निश्चितच अशा महिलांकडूनही पैसे परत घेतले जातील.
महिलांनी स्वतःहून पुढे यावे
चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.