Published on
:
07 Feb 2025, 1:12 am
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातार्याजवळ लिंबखिंड केबीबी कॉलेजनजीक वरे गावच्या हद्दीत दुचाकीची ट्रकला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात ऋषीकेश राजेंद्र देशमाने (वय 27, रा. मंगळवार पेठ, निपाणी) हा युवक जागीच ठार झाला. अपघात बुधवारी मध्यरात्री झाला. घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. हेल्मेट असतानाही ऋषीकेशच्या डोक्याला जबर मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऋषीकेश हा पुणे येथे आपल्या बहिणीकडे राहून एका कंपनीत काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या मित्राचा निपाणीत लग्नसोहळा असल्याने तो मूळगावी आला होता. बुधवारी सायंकाळी तो परत जात होता. वरे गावच्या हद्दीत ट्रकला ऋषीकेशच्या दुचाकीची मागून धडक बसली.
घटनास्थळी सातारा तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मोरडे व हवालदार किशोर वायदंडे यांनी भेट देऊन पाहणी करून मृताची ओळख पटवली. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी निपाणी व पुणे येथील नातेवाईक दाखल झाले. गुरुवारी ऋषीकेशच्या मृतदेहावर निपाणी येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे. एकुलता एक असलेल्या ऋषीकेश याचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ऋषीकेशने डोक्यावर हेल्मेट परिधान केले होते. मात्र, मध्यरात्री पुढे निघालेले वाहन त्याला न दिसल्याने त्याच्या दुचाकीची मागून जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, ऋषीकेश याच्या डोक्यावर हेल्मेट असतानाही त्याचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती सातारा पोलिसांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.